पिंपरी-चिंचवडमधील ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापालिकेच्या वतीने सन्मान
पिंपरी, ता. १५ - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आज पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहराच्या सांस्कृतिक जडणघडणीत सायकर काकांचे योगदान अत्यंत उल्लेखनीय आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या नावलौकिकात आपल्या कार्यकर्तृत्वाने मोलाची भर घालणाऱ्या तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सन्मान करण्याचे धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार सायकर काकांना गौरवण्यात आले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे, विरोधी पक्षनेते भाऊसाहेब भोईर, आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे, शिवसेना गटनेते विश्वजीत बारणे, माजी महापौर तथा नगरसदस्या अपर्णा डोके, नगरसदस्या मनिषा चिंचवडे, नगरसदस्य अनंत कोऱ्हाळे, सुरेश भोईर तसेच उपआयुक्त अण्णा बोदडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह ज्येष्ठ तबलावादक धोंडीराम सायकर यांची मुले नरेंद्र सायकर, निलेश सायकर व नातू साहिल सायकर हे देखील उपस्थित होते. यावेळी मानपत्राचे वाचन जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांनी केले.
सायकर काकांनी सांगीतिक व्यासपीठांवर तबल्याची साथसंगत करताना त्यांनी भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा जपली आहे. नवोदित कलाकारांना मार्गदर्शन, स्पर्धांमध्ये परीक्षक म्हणून योगदान आणि सांस्कृतिक क्षेत्रातील सातत्यपूर्ण कार्यामुळे शहराच्या सांस्कृतिक वातावरणाला त्यांनी समृद्ध केले आहे. त्यांना विविध प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.