ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी तिसऱ्यांदा घेतली राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ
पवार यांच्यासह महाराष्ट्रातील नेते खासदार रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते आणि ज्योती वाघमारे यांनीही घेतली शपथ
पुणे, ता. ६ - राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सोमवारी (ता. ६) तिसऱ्यांदा राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. पवार यांनी नुकतीच संसदीय कारकिर्दीची ५९ वर्षे पूर्ण केली आहेत. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शरद पवार यांनी व्हिलचेअरवर बसूनच राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली.
राज्यसभेची द्वैवार्षिक निवडणूक १६ मार्चला पार पडली. या निवडणूकीत विजयी झालेल्या नव्या सदस्यांना आज, सोमवारी (ता. ६) राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते शपथ देण्यात आली. शरद पवार यांच्यासह देशातील 19 नवीन राज्यसभा सदस्यांनी शपथ घेतली. यामध्ये महाराष्ट्रातील पाच खासदारांनी देखील राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यामध्ये पवार यांच्यासह रामदास आठवले, रामराव वडकुते, माया ईवनाते आणि ज्योती वाघमारे यांचा समावेश आहे. यावेळी, उपसभापती हरिवंश नारायण सिंह आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू उपस्थित होते. राजकीय पक्षांचे सभागृह नेते आणि इतर सदस्यही या सोहळ्याला उपस्थित होते.
सन १९६७ मध्ये शरद पवार यांनी आमदारकीची निवडणूक पहिल्यांदा जिंकली. त्यानंतर चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीही झाले. पवार सन १९७८ मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर १९८४ ला त्यांनी बारामतीतून खासदारकीची निवडणूक लढवली. सन १९८५ मध्येही त्यांनी विधानसभा लढवून ते सन १९९०पर्यंत बारामतीचे आमदार होते.
बारामती लोकसभा मतदारसंघातून सन १९९१ पासून २०१४ पर्यंत पवार खासदार होते. सन २०१४ पासून ते राज्यसभेचे खासदार आहेत. आज आता पुन्हा शरद पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. आता ते सन २०३२ पर्यंत खासदार असतील.