किल्ले शिवनेरीवर छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दिमाखात साजरी 

पुणे, ता. १९ - छत्रपती शिवाजी महाराजांचा ३९६ वा शिवजन्म सोहळा किल्ले शिवनेरीवर दिमाखात, प्रचंड उत्साहात व जल्लोषात साजरा करण्यात आला. 'छत्रपती शिवाजी महाराज की जय', 'जय जिजाऊ जय शिवराय' 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय', 'तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय' या अखंड जयघोषाने सबंध शिवनेरी किल्ल्याचा परिसर दुमदुमून गेला. 

किल्ले शिवनेरी येथे सकाळी नऊच्या सुमारास गडावरील शिवकुंज येथील राजमाता जिजाऊ व बालशिवबा यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शिवजन्मस्थळ येथे बालशिवबा यांच्या जन्माचा सोहळा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार, सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, आमदार शरद सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बालशिवबा यांचा पाळणा जोजवून शिवजन्म सोहळा पार पडला. यावेळी मराठा सेवा संघाच्या वतीने मान्यवरांचे औक्षण करण्यात आले. यावेळी

मराठा सेवा संघाच्या महिलांनी पारंपरिक वेशभूषा व पारंपरिक पद्धतीने पाळणा गायला. शिवजन्माचा आनंद सोहळा उपस्थितांना सुंठवडा व पेढे वाटून साजरा करण्यात आला. यानंतर महाराष्ट्र राज्याच्या पोलिस दलाच्या बँड पथकाकडून बंदुकीच्या फैरी झाडत छत्रपती शिवरायांना मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ओतूर क्रमांक एक व दोनच्या विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली लेझीम पथकाच्या माध्यमातून सादर केलेल्या शिवचरित्रावर आधारित प्रसंग सादर केले.

याप्रसंगी मराठा सेवा संघाच्या अभिवादन सभेत शासकीय शिवनेर भूषण पुरस्कारांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी निवड झालेली पिंपळवंडी गावची कन्या श्रुतिका प्रवीण ताथवडे, मद्रास ट्रेंटी रेजिमेंटमध्ये लेफ्टनंटपदी निवड झालेले वारूळवाडीचे सुपुत्र अजिंक्य संजय मेहेर यांच्या वतीने कुटुंबीय, खारघर येथील टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख डॉ. विनोद सीताराम हांडे यांना वैद्यकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल, जुन्नर तालुका पंचायत समितीचे अकरा वर्षे सभापती राहिलेले शिवाजीराव नामदेव खैरे यांना राजकीय व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल; तर कृषी क्षेत्रात मोलाचे योगदान राहिलेले प्रगतशील ऊस उत्पादक शेतकरी स्व. पंकज शिवाजी वामन यांच्यावतीने कुटुंबीयांना मरणोत्तर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance