तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर उद्या छत्रपती शिवरायांना व धर्मवारी संभाजी महाराजांना केले जाणार सामूहिक अभिवादन
Mar 05 2026
58
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर उद्या छत्रपती शिवरायांना व धर्मवारी संभाजी महाराजांना केले जाणार सामूहिक अभिवादन
पिंपरी, ता. ५ - छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती शुक्रवारी (ता. ६) तिथी प्रमाणे साजरी होत आहे. त्यानिमित्त तळेगाव दाभाडे नगरपरिषदेसमोर असलेल्या छत्रपती श्री शिवशंभू तीर्थ स्मारकाजवळ सकाळी ७ वाजता अभिषेक व पूजन सोहळा आयोजित केला आहे.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतींना या सोहळ्यातून वंदन केले जाणार आहे. आयपीएस वैभव निंबाळकर हे या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या शुभहस्ते अभिषेक व पूजन विधी होणार आहेत. छत्रपती श्री शिवशंभू तीर्थ स्मारकाच्या अनावरणानंतर प्रथमच हा अभिषेक सोहळा होत आहे.
या दिमाखदार सोहळ्यामध्ये, तळेगाव शहरातील सर्व मंडळांकडून गडकोट किल्ल्यांवरून आणण्यात आलेल्या शिवज्योतींचे भव्य स्वागत सकाळी ७.३० ते १०.३० या वेळेत करण्यात येणार आहे. यावेळी नगराध्यक्ष संतोष दाभाडे व सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत, सायंकाळी नऊ वाजता ग्रामदैवत डोळसनाथ महाराज उत्सव समिती आयोजित श्री शिवजयंती मिरवणुकीचा छत्रपती शिवशंभू स्मारकापाशी भव्य समारोप होणार आहे. त्यानंतर फटाक्यांची नेत्रदीपक आतषबाजी होणार आहे.
शिवशंभू तीर्थ समिती अध्यक्ष संतोष भेगडे (पाटील) यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. तळेगाव दाभाडे शहरातील सर्व नागरिकांनी कुटुंबासह या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.