शिवाजीनगरमधील एसटी स्थानकाच्या जागेवर उभे राहणार संकुल, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची माहिती
शिवाजीनगरमधील एसटी स्थानकाच्या जागेवर उभे राहणार संकुल, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांची माहिती
पुणे, ता. ११ - शिवाजीनगरमधील एसटी स्थानकाच्या जागेवर खासगी-सार्वजनिक भागीदारीतून (पीपीपी) संकुल उभारणार असून, त्याबाबत एसटी महामंडळाशी करार होणार आहे. या संकुलात मेट्रोबरोबरच एसटी बसस्थानकही असेल, तसेच पीएमपीच्या थांब्यांसाठीही जागा उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी दिली. करार झाल्यानंतर संकुलाचे काम सुरु होणार आहे.
याबाबत बोलताना हार्डीकर यांनी संगितले की, एसटी स्थानकाबाबत एसटी महामंडळाशी चर्चा झाली आहे. करार झाल्यावर आराखडा निश्चित होऊन पुढील प्रक्रिया मार्गी लागेल. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यातील मेट्रोच्या विस्तारित मार्गासाठी वेगाने प्रक्रिया सुरु आहे. वनाज-चांदणी चौक आणि रामवाडी-वाघोली (विठ्ठलवाडी) मेट्रो मार्गासाठी काम सुरू झाले आहे. वनाज-चांदणी चौक मार्गासाठी काम सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. रामवाडी-वाघोली मार्गातील काही भाग महाराष्ट्र विकास पायाभूत महामंडळ आणि महामेट्रो संयुक्तपणे करणार आहे. त्यासाठीची तांत्रिक प्रक्रिया सुरु आहे. खराडी ते खडकवासला आणि नळस्टॉप, वारजे, माणिकबाग मार्गासाठी खासगी आणि शासकीय जागेचे भूसंपादन करण्यासाठीची प्रक्रिया सुरु आहे.
मेट्रो स्थानकाच्या परिसरात २५ मीटरमध्ये प्रवाशांना फिडर सर्व्हिस उपलब्ध व्हावी, यासाठी महामेट्रो प्रयत्नशील आहे. त्यासाठी पीएमपीबरोबर सातत्याने चर्चा आणि नियोजन सुरू आहे. रिक्षा संघटनांनाही त्यात सहभागी करुन घेण्यात येत आहे. मात्र, पीएमपी हा आमचा पहिला पर्याय आहे, असे हर्डीकर यांनी सांगितले.
मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरु
''शहर, जिल्हा आणि परिसरात मेट्रोच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरु आहे. त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे. तसेच दोन्ही महापालिका, पीएमआरडीए, पीएमपी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याशी समन्वय साधून मेट्रो प्रकल्पाला गती देण्यात येत आहे. प्रवासीकेंद्रित नियोजन आणि सुविधांवर महामेट्रोचा भर आहे.''
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो