श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त चिंचवडमध्ये पाच दिवसीय प्रकटदिन उत्सव
Mar 11 2026
56
श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त चिंचवडमध्ये पाच दिवसीय प्रकटदिन उत्सव
पिंपरी, ता. ११ - श्री स्वामी समर्थ प्रकटदिनानिमित्त चिंचवडगावातील श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळातर्फे येत्या सोमवारपासून (ता. १६) पाच दिवसीय श्री स्वामी समर्थ प्रकटदिन उत्सवाचे आयोजन केले आहे. बुकॉऊ वुल्फ कॉलनी, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग (पिंपरी-चिंचवड लिंक रोड), चिंचवडगाव येथील स्वामी समर्थ मठाच्या प्रांगणात सोमवारी पहाटे ४:३० वाजता ‘श्रीं’चा पंचामृत अभिषेक व पूजा आणि ६ वाजता उत्सव कलशाची स्थापना करुन उत्सवाचा प्रारंभ होणार आहे.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी सायंकाळी ६ वाजता अवधूत गांधी यांचा गाण्यांचा कार्यक्रम होईल. मंगळवारी (ता. १७) सायंकाळी ६ वाजता भक्तिगंधर्व मुकुंद बादरायणी आणि सहकारी स्वरसमर्थ अभंगवाणी सादर करतील. बुधवारी (ता. १८) सायंकाळी ६ वाजता योगेश तपस्वी बहारदार भक्तिगीते सादर करतील. गुरुवारी (ता. १९) सायंकाळी ६ वाजता आशुतोष झा यांचे ऐतिहासिक शिवशंभो गाथा व्याख्यान होईल. शुक्रवारी (ता. २०) सायंकाळी ६ वाजता राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त गायिका सावनी रवींद्र ‘घन अमृताचा’ हा सुश्राव्य गीतांचा कार्यक्रम सादर करणार आहेत.
प्रकटदिन उत्सव काळात दररोज पहाटे ४.३० वाजता अभिषेक व पूजा आरती, सकाळी ८.३० ते दुपारी ४ वाजेपर्यंत स्वामी स्वाहाकार, श्रीगुरुलीलाअमृत ग्रंथ पारायण, दुपारी १२ वाजता महानैवेद्य व आरती, भजनसेवा, कीर्तन, सामुदायिक रुद्राभिषेक इत्यादी धार्मिक विधी संपन्न होतील. शुक्रवार, २० मार्च रोजी दुपारी १२.३० ते ३ या वेळेत महाप्रसाद वाटप होणार आहे. या पाच दिवसीय प्रकटदिन उत्सव सोहळ्यातील सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचा सर्व नागरिकांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सत्संग मंडळाचे अध्यक्ष दिनकर चिंचवडे (पाटील) यांनी केले आहे.