प्रभाग क्रमांक १० मधील गरजू विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नगरसेवक तुषार हिंगे यांनी हाती घेतलाय कौतुकास्पद उपक्रम
Apr 14 2026
50
प्रभाग क्रमांक १० मधील गरजू विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त नगरसेवक तुषार हिंगे यांनी हाती घेतलाय कौतुकास्पद उपक्रम
पिंपरी, ता. १४ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त साऊंड व डीजेवर होणारा अनावश्यक खर्च टाळत, प्रभागातील गुणवंत व गरजू विद्यार्थ्यांसाठी तब्बल पाच लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम नगरसेवक तुषार रघुनाथ हिंगे यांनी हाती घेतला आहे. तुषार हिंगे व आरंभ सोशल फाउंडेशन यांच्या माध्यमातून हा उपक्रम दरवर्षी राबवला जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” या विचारांतून प्रेरणा घेऊन हा उपक्रम राबवण्यात आला आहे. यामध्ये पिंपरी विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १० मधील लालटोपीनगर, मोरवाडी, विद्यानगर, इंदिरानगर, दत्तनगर, परशुराम नगर, शंकरनगर आणि अण्णासाहेब नगर या भागांतील दहावी व बारावी परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
''आरंभ फाउंडेशनच्या वतीने यशस्वी भव या उपक्रमांतर्गत दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून शैक्षणिक साहित्याचे वाटपही केले जाते. या नव्या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांतील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. प्रभागातील अनेक कुटुंबे आर्थिकदृष्ट्या मर्यादित आहेत. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी ही मदत निश्चितच उपयोगी ठरेल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.'', असे तुषार हिंगे यांनी सांगितले.