मावळात शेतजमिनीच्या वादात अभिनेत्री सोनाली बेंद्रे व पती गोल्डी बहल अडचणीत
पिंपरी, ता. ३ - मावळ तालुक्यातील उकसान येथे शेतजमिनीच्या वादावरुन बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि त्यांचे पती गोल्डी बहल अडचणीत आले आहेत.
स्थानिक शेतकरी चंद्रकांत शिंदे यांनी वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला आहे. संबंधित ३० गुंठे जमीन ही सन १९५७ च्या आधीपासून वडिलोपार्जित कुळ हक्काची असल्याचा दावा केला आहे. खोट्या कागदपत्रांच्या आधारे जमीन खरेदी केल्याचा आणि बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. जमिनीच्या ठिकाणी येऊन शिंदे कुटुंबांना दमदाटी केल्याचाही आरोप फिर्यादीची वकील वनराज शिंदे यांनी केला आहे. संबंधित जागेवर बेकायदेशीर बांधकामाचा प्रयत्न आणि कुटुंबीयांना दमदाटी केल्याचाही आरोप आहे.
या प्रकरणी यापूर्वी पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या होत्या. मात्र प्रकरण दिवाणी स्वरुपाचे असल्याने न्यायालयात दाद मागण्यात आली आहे. सध्या न्यायालयात मनाई आदेशाची मागणी करण्यात आली असून पुढील सुनावणी २० एप्रिल रोजी होणार आहे. दुसरीकडे सोनाली बेंद्रे यांचे वकील राजू शिंदे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून फिर्यादी शेतकरी हे प्रसिद्धीसाठी आणि पैशांसाठी सोनाली बेंद्रे आणि गोल्डी बेहल यांची बदनामी करण्याचा डाव आखत आहे, असे म्हटले आहे.