'स्पीड लिमिट' ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवणार 'स्पीड कॅमेरे', वडगाव मावळमध्ये प्रकल्पाचे उद्घाटन
पिंपरी, ता. ९ - वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांनी लेझर स्पीड कॅमेऱ्यांचा प्रकल्प कार्यान्वित केला जात आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्या हस्ते वडगाव मावळ पोलिस ठाण्यात करण्यात आले.
ग्लोबल रोड सेफ्टी पार्टनरशिपचे वरिष्ठ रोड पोलिसिंग सल्लागार पॉल सिमकॉक्स यांच्या वतीने पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांच्याकडे हे स्पीड कॅमेरे अधिकृतपणे सुपूर्द करण्यात आले.
या प्रकल्पाअंतर्गत जुन्या मुंबई-पुणे महामार्गासह पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रातील विविध ठिकाणी तीन स्पीड कॅमेरे तैनात केले आहेत. रस्ते अपघातांवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे कॅमेरे महत्वाचे आहेत.
पुणे ग्रामीण रस्ते सुरक्षा अहवाल २०२२-२०२३ नुसार, २०२२ आणि २०२३ या कालावधीत जिल्ह्यातील एकूण प्राणघातक अपघातांपैकी ५७ टक्के अपघात पुणे ग्रामीण क्षेत्रात नोंदवले गेले. या अपघातांमध्ये प्रामुख्याने दुचाकीस्वार आणि पादचारी अपघाताला बळी पडले आहेत. सन २०२३ मध्ये पुणे ग्रामीण पोलिसांच्या कार्यक्षेत्रात रस्ते अपघातांमुळे ९८३ मृत्यू नोंदवले गेले असून, ही संख्या मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ५ टक्क्यांनी अधिक आहे.
यावेळी, पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल म्हणाले, ''पुणे ग्रामीण भागातील अनेक रस्ते अपघातांमध्ये दुचाकीस्वार आणि पादचारी यांचे प्रमाण अधिक आहे. अतिवेग हा अपघातांचे प्रमुख कारण असल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा पायलट प्रकल्प राबविण्यात येत आहे. जनजागृती मोहिमेसह या अंमलबजावणीमुळे अपघात तसेच मृत्यू आणि जखमींची संख्या कमी होण्यास मदत होईल.''