एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसेसची भर पडणार, एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांचा प्रवाशांना मोफत वापर करता येणार
एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसेसची भर पडणार,
एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृहांचा प्रवाशांना मोफत वापर करता येणार
पुणे, ता. १७ - एसटी महामंडळाच्या ताफ्यात तब्बल ८ हजार नव्या बसची टप्प्याटप्प्याने भर घातली जाणार आहे. याशिवाय, बसस्थानकांवरील कॅन्टीनमध्ये ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक असेल आणि येत्या १ जूनपासून राज्यातील सर्व एसटी बसस्थानकांवरील स्वच्छतागृह प्रवाशांसाठी मोफत करण्यात येणार आहेत, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोल्हापूर दौऱ्यादरम्यान केली आहे.
राज्यातील एसटी प्रवाशांच्या मूलभूत सोयीसुविधांमध्ये सुधारणा करण्यासाठी राज्य सरकारने हे पाऊल उचलले आहे. अनेक बसस्थानकांवर स्वच्छतागृह वापरासाठी आकारले जाणारे शुल्क प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत होते. ही बाब लक्षात घेऊन आता १ जूनपासून सर्व स्वच्छतागृह विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. या निर्णयामुळे दररोज प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांना थेट दिलासा मिळणार आहे.
तसेच, एसटी महामंडळाच्या ताफ्यात ८ हजार नव्या बसची भर घालण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ग्रामीण व दुर्गम भागांमध्ये सेवा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जाणार आहे. या बस टप्प्याटप्प्याने प्रत्येक जिल्ह्यात पाठविण्यात येणार असून, जुन्या बसांच्या जागी नव्या, सुरक्षित आणि आरामदायी बस उपलब्ध करून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
दरम्यान, बसस्थानकांवरील कॅन्टीनमध्ये प्रवाशांकडून आकारले जाणारे वाढीव दर लक्षात घेऊन ३० रुपयांत चहा-नाश्ता देणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमाचे पालन न करणाऱ्या कॅन्टीन चालकांवर कडक कारवाई करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकातील कॅन्टीनची पाहणी करताना स्वच्छता समाधानकारक आढळली. मात्र, दरफलकांवर चिकटपट्टी लावून दर लपवण्याचा प्रकार समोर आल्याने मंत्री सरनाईक यांनी अधिकाऱ्यांना सुनावले. दरम्यान, एसटी प्रवाशांच्या सोयीसाठी घेतलेले हे निर्णय प्रत्यक्षात कितपत प्रभावीपणे राबवले जातात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.