राज्यभरात आज वादळी पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट'
पुणे, ता. २ - मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात आज गुरुवारी (ता. २) वादळी पाऊस व गारपीटची शक्यता आहे आणि उर्वरित राज्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने सांगितली आहे.
पूर्व बिहारपासून उत्तर मध्य महाराष्ट्रापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात ढगाळ हवामान आणि पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. १ एप्रिलला सकाळी ८.३० पर्यंतच्या २४ तासांत देशातील सर्वाधिक तापमान मध्य प्रदेशातील होसिंगाबाद येथे ४०.३ अंश सेल्सिअस नोंदवले गेले आणि सर्वांत कमी तापमान पंजाबच्या अमृतसर येथे १४.६ अंश सेल्सिअस होते.
१ एप्रिललाच राज्यात सर्वाधिक तापमान मालेगाव आणि अमरावती येथे ३८.४ अंश सेल्सिअस नोंदले आहे आणि सर्वात कमी तापमान निफाड येथील गहू संशोधन केंद्रात १७.८ अंश सेल्सिअस नोंदले आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.
- असा आहे अलर्ट.....
- ऑरेंज अलर्ट (वादळी पाऊस आणि गारपीट) - नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यांत वादळी वारे, विजांचा कडकडाट, पाऊस आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता.
- येलो अलर्ट (वादळी पाऊस) - राहिलेल्या सर्व जिल्ह्यांत विजांसह वादळी पावसाची शक्यता.