news
clock

शहरात श्वान संगोपन केंद्रासाठी योग्य जागा शोधाव्यात, महापौर रवी लांडगे यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा घेतला आढावा

पिंपरी, ता. ११ - शहरातील भटक्या श्वानांच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक प्रभागात श्वान संगोपन केंद्र उभारण्यासाठी योग्य जागा शोधाव्यात, अशा सूचना महापौर रवी लांडगे यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पशुवैद्यकीय विभागाच्या कामकाजाचा  महापौरांनी नुकताच आढावा घेतला. 

पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील दिवंगत महापौर मधुकरराव पवळे सभागृहात ही बैठक झाली. भटक्या श्वानांचे संगोपन, लसीकरण, उपचार तसेच नागरिकांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण यावर चर्चा झाली. शहरात श्वान संगोपन केंद्र उभारल्यास भटक्या श्वानांचे लसीकरण, नसबंदी व आरोग्य तपासणी अधिक परिणामकारकपणे करता येईल, असे महापौरांनी सांगितले. यासाठी नगरसेवकांच्या सहकार्याने प्रभागनिहाय उपलब्ध जागांची पाहणी करुन सविस्तर प्रस्ताव देण्याचे निर्देश त्यांनी दिले. या बैठकीस उपमहापौर शर्मिला बाबर, नगरसेविका वैशाली काळभोर, वैशाली घोडेकर, अर्चना सस्ते, तसेच नगरसदस्य अनंत कोन्हाळे, मंदार देशपांडे, उत्तम केंदळे, संजय काटे, सुहास कांबळे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.  

शहरातील भटक्या व पाळीव श्वानांची अचूक संख्या, त्यांचे वितरण तसेच नसबंदी व लसीकरणाची सद्यःस्थिती याबाबत सविस्तर सर्वेक्षण करावे. तत्काळ श्वानांबाबतच्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी पशुवैद्यकीय विभागाने समन्वयाने काम करावे. नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण तातडीने करावे, असे महापौरांनी सांगितले.

''प्राणी जन्म व नियंत्रण मोहिमेसाठी सध्या चार विशेष वाहने कार्यरत आहेत. या वाहनांद्वारे श्वान पकडणे, नसबंदी करणे आणि त्यांना पुन्हा त्यांच्या परिसरात सोडणे ही प्रक्रिया राबविली जाते. तसेच जखमी व आजारी प्राण्यांवर उपचार करून नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही केली जात आहे. '' अशी माहिती उपायुक्त संदीप खोत यांनी दिली.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories