news
clock

'वायसीएम' रुग्णालयात २० वर्षीय तरुणीला मिळाली जीवनाची नवसंजीवनी 

पिंपरी, ता. ५ - दुर्मीळ आजाराने ग्रस्त असलेल्या २० वर्षीय तरुणीला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाच्या डॉक्टरांनी शस्त्रक्रियेद्वारे जीवनाची नवसंजीवनी मिळाली आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुमारे सात तास चालली. वायसीएममध्ये ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.

या तरुणीला 'नॉन-सिरोटिक पोर्टल फायब्रोसिस' आणि 'ऑटोइम्यून हिपॅटायटीस' या दुर्मीळ आजारांचा त्रास होता. या आजारामुळे शरीरातील रोगप्रतिकारशक्ती यकृतातील रक्तवाहिन्यांवर हल्ला करत असल्याने रक्तदाब प्रचंड वाढत होता. परिणामी तिची प्लीहा तब्बल ७०० ग्रॅमपर्यंत वाढली होती. वैद्यकीय भाषेत या अवस्थेला 'पॅनसाइटोपेनिया' असे म्हणतात. 

या स्थितीत 'प्रॉक्सिमल स्प्लेनोरेनल शंट' ही अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉ. संतोष थोरात यांच्या नेतृत्वाखाली डॉ. मयूर बाविस्कर, डॉ. राहुल निकम, डॉ. दत्तात्रय तोरडमल तसेच भूलतज्ज्ञ परिचारिकांच्या पथकाने ही शस्त्रक्रिया यशस्वी केली. खासगी रुग्णालयात ५ ते १० लाख रुपयांचा खर्च सांगितला होता. मात्र, वायसीएममध्ये ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली.

यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे विभागप्रमुख डॉ. संतोष थोरात म्हणाले की, ''रुग्णाची प्रकृती अत्यंत गंभीर होती. शस्त्रक्रिया हाच एकमेव पर्याय होता. आमच्या टीमच्या तांत्रिक कौशल्यामुळे ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.''

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories