news
clock

नियमोल्लंघन केल्यास आरएमसी प्लांट्स व बांधकाम साईट्सला कठोर कारवाईचा इशारा

वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाचे पाऊल 

पिंपरी, ता. ४ - महापालिकेच्या पर्यावरण विभागाने आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट, बांधकामांची ठिकाणे तसेच बांधकाम साहित्य पुरवठादारांना धूळ व वायुप्रदूषण रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. नियमांचे पालन न करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशाराही महापालिकेने दिला आहे.

शहरातील वाढते वायुप्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी व हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या अंतर्गत आरएमसी प्लांट, बांधकाम स्थळे तसेच बांधकाम साहित्य साठवणूक ठिकाणी धूळ नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना करणे बंधनकारक करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १७ ऑक्टोबर २०२४ रोजी जारी केलेल्या परिपत्रकानुसार या ठिकाणी धूळ नियंत्रणासंबंधी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या वायू गुणवत्ता निर्देशांक मोजणी केंद्रांच्या नोंदीनुसार शहरातील हवेची गुणवत्ता सध्या 'मध्यम' (१०० ते १५०) श्रेणीत आहे. या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

गरज भासल्यास आरएमसी प्लांट सील करणार 

''पिंपरी-चिंचवड शहरातील संबंधित आस्थापनांची (आरएमसी प्लांट) महापालिका क्षेत्रीय कार्यालयांमार्फत नियमित तपासणी करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. आवश्यक उपाययोजना पूर्ण होईपर्यंत संबंधित आस्थापना बंद ठेवण्यात येणार असून गरज भासल्यास सील करण्याची कारवाईही केली जाईल.''

- संजय कुलकर्णी, मुख्य अभियंता, महापालिका

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories