सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम अंतिम टप्प्यात, एप्रिल अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
पिंपरी, ता. २१ - पुण्यातील सनसिटी ते कर्वेनगरला जोडणाऱ्या पुलाचे काम आता अंतिम टप्प्यात असून ते एप्रिलअखेरपर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर सिंहगड रस्त्यावरील वाहतूकीचा ताण कमी होणार आहे.
सिंहगड रस्त्यावरुन कर्वेनगर, कोथरुड, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता, कात्रज येथून नागरीकांची ये-जा सातत्याने सुरु असते. त्यामुळे दररोज सकाळी व सायंकाळी पुणे- बंगळूर महामार्गावर वारजेमधील पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. त्यामुळे सुरळीत वाहतूकीसाठी महापालिकेकडून सनसिटी ते कर्वेनगर या दरम्यान मुठा नदीवर पुल बांधण्याचे काम हाती सप्टेंबर २०२३ पासून घेण्यात आले.
त्यानुसार, कर्वेनगरकडील बाजूला खांब, गर्डर टाकण्याचे तसेच पोहोच रस्त्याचे काम झाले आहे, तर सनसिटीकडील बाजूच्या सहा खांबांपैकी चार खांबांचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित खांबांचे काम सुरु आहे. सनसिटीकडील बाजूला स्पॅन, पुलाच्या उतारासाठीचे काम अद्याप झालेले नाही. हे काम पूर्ण होण्यास आणखी दोन महिने लागणार आहे. त्यानंतर दोन्ही बाजूंना पोहोच रस्ते, डांबरीकरण, विद्युत दिवे, पावसाळी पाण्याच्या वाहिन्या, पदपथ अशी कामे करावयाची आहेत. येत्या दोन महिन्यांत संबंधित कामे पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. एप्रिलअखेरपर्यंत सर्व कामे पूर्ण करुन हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाची कार्यवाही सुरु आहे.
एप्रिल अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट
''सनसिटी ते कर्वेनगर पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. कर्वेनगरकडील पुलाचे काम झाले आहे, आता सनसिटीकडील काम सुरु असून एप्रिल अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे.''
- दिनकर गोजारे, प्रमुख, विशेष प्रकल्प विभाग, पुणे महापालिका
सनसिटी ते कर्वेनगर पुलाची माहिती अशी .....
- पुलाच्या कामासाठी येणारा खर्च ४४ कोटी ८६ लाख रुपये
- पुलाची लांबी - २७९ मीटर
- रुंदी - ३० मीटर
- पोहोच रस्त्याची लांबी (सॉलिड रॅम्प) ३४ मीटर,
(कर्वेनगर बाजू) - २० मीटर (सनसिटी बाजू)
- पोहोच रस्त्याची रुंदी - ३० मीटर
- एकूण गाळे - ९
- अस्तित्वातील रस्त्याची रुंदी ३० मीटर (सनसिटी बाजू)