महिलांना नवनवीन क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण दिले पाहिजे - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार
पिंपरी, ता. ९ - "सर्वच उद्योगांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज भासते. त्यातील महिलांचे प्रमाण वाढण्याची गरज आहे. महिला शिवणकाम, ब्युटी पार्लर असे उद्योग करतात. त्या पलीकडे जाऊन उद्योगांची गरज लक्षात घेऊन महिलांना नवनवीन क्षेत्रातील कौशल्य प्रशिक्षण दिले पाहिजे. महिलांनी स्वतःवर विश्वास ठेवून कामांत अद्ययावत राहिले पाहिजे. मैत्रिणींनो, तुम्ही सक्षम झाला, तरच आपला समाज, आपला देश जागतिक स्तरावर सक्षम म्हणून ओळखला जाईल", असे मत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केले.
जागतिक महिला दिनानिमित्त किवळे येथील सिंबायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटी येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंग पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालयाच्या संचालिका संजीवनी मुजुमदार, सिंबायोसिस स्किल्स अॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या प्र कुलपती डॉ. स्वाती मुजुमदार आदी मान्यवर उपस्थित होते.
'कुशल महिला, सक्षम समाज, प्रगत देश' या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनिता अगरवाल, पुनम कोचर, डॉ. संचिता कुमार, नेहा व्यास, पूजा मिसाळ यांना पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आमदार राणा जगजितसिंग म्हणाले, ''विविध क्षेत्रांमध्ये स्वतःच्या पायावर उभे राहिल्यानंतर कुटुंबातील आई, बहिण किंवा पत्नीला जो आदर मिळतो. तो निश्चितपणे वेगळा असतो. त्यामुळे महिलांना ही संधी उपलब्ध करून देण्याऱ्या विद्यापीठाचे खरंच कौतुक आहे.''
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. स्वाती मुजुमदार यांनी प्रास्ताविक केले. सुनीता निकम यांनी सूत्रसंचालन केले. दीपा करंदीकर यांनी आभार मानले.