Sunday Vibes .....

'गॉसिपिंग'ला दिली कायमची सुट्टी अन् महिलांनी केली कलांशी गट्टी 

मोशीतील पीएमआरडीए गृहप्रकल्पातील हरिश्चंद्रगड सोसायटीतील भगिनीं राबवताहेत स्तुत्य उपक्रम 

संध्या नांगरे - पीसीएमसी न्यूज 

पिंपरी, ता. २२ - गृहरचना संस्था किंवा सोसायटी म्हटलं की घराला घर लागून. मग, एकमेकांसोबत रुसवे-फुगवे हे ठरलेले असतात. त्यातही सोसायटीतील महिला या रुसव्याफुगव्यांमध्ये आणि 'गॉसिंपिंग'मध्ये रमलेल्या दिसतात, हे असंच चित्र सोसायट्यांमध्ये सर्रास पाहायला मिळतं. परंतु, या समीकरणाला छेद दिलाय मोशीमधील पीएमआरडीए गृहप्रकल्पातील हरिश्चंद्रगड सोसायटीतील महिलांनी. गेली तीन वर्ष या सोसायटीतील महिला एकत्र येऊन विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करत आहे आणि त्यातून त्यांना विविध कला आत्मसात करण्याचा छंद जोपासला आहे. यंदा, महिला दिनानिमित्त या महिला एखाद्या सभागृहात सादर करावा असा दोन-अडीच तासांचा कार्यक्रम सादर करणार आहेत आणि त्यासाठीच सध्या त्यांची जोरदार तयारी सुरु आहे. या भगिनींचे विधायक उपक्रम समाजापर्यंत पोचवण्यासाठी 'पीएसीएमसी न्यूज'ने हरिश्चंद्रगड सोसायटीतील रहिवाशांशी संवाद साधला.

 मोशी (सेक्टर १२) येथील पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) गृहप्रकल्पातील  एक हरिश्चंद्रगड सोसायटी आहे. सन २०२३ मध्ये सर्व सदनिकाधारक राहायला आल्यानंतर परस्परांचा परिचय झाला. आपण काहीतरी कार्यक्रम करु असे ठरवल्यानंतर अनेकांकडे असणारे विविध कलागुणही समजले. या रहिवाशांमधील एक रहिवासी म्हणजे....असलेले पिंपरी-चिंचवडमधील गुणवंत कथक नर्तक व महापालिकेचे कर्मचारी मिलिंद रणपिसे. मिलिंद यांचा परिचय झाल्यावर सारे रहिवासी आनंदून गेले. त्यांच्या रुपाने सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनासाठी सर्वांना विशेषतः महिला वर्गाला हक्काचे 'दादा' मिळाले आणि मग काय, हरिश्चंद्रगड सोसायटीमध्ये विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरु झाली.   

वर्षभरातील सर्व सण उत्सव सोसायटीमध्ये एकोप्याने साजरे होऊ लागले आणि यामध्ये मिलिंद यांचे मार्गदर्शन घेऊन महिला वर्ग उत्तम कार्यक्रम साकारु लागल्या. मिलिंद यांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेऊन सोसायटीतील भगिनींमध्ये तसेच शालेय विद्यार्थ्यांमध्ये गायन-वादन-नृत्य कलेची आवड निर्माण केली. त्यामुळे, अनेक पालकांना आणि त्यांच्या पाल्यांना कलेचा छंद लागला आहे, हे कौतुकास्पद आहे. 


सध्या, हरिश्चंद्रगड सोसायटीतील भगिनींची जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमासाठी मोठी तयारी सुरु आहे. 'द फोक आख्यान' या प्रसिद्ध सांस्कृतिक कार्यक्रमातील "माझं राजं छत्रपती झालं गं " या सुप्रसिद्ध घाटोळीवर सादरीकरण करुन भगिनी छत्रपती शिवरायांना अभिवादन करणार आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर नृत्य सादरीकरण होणार आहे. यामध्ये, जयश्री साबणे, अपुर्वा पाटील, माधुरी वैदय, जयश्री बोरुळकर, सोनाली हिरवे, कोमल खंडारे, कल्याणी खंडारे, संगीता रणपिसे, शितल माळी, पल्लवी माळी, हिमानी भोसले, श्रदधा पामे, प्रतिभा कांबळे, शुभांगी वंगवाड या विविध वयोगटातील माता आणि शांभवी रणपिसे, ओवी कांबळे, प्रणवि माळी, अनन्या वंगवाड, अवनी वंगवाड, रेहाली शिंदे , शिवांशी आंबवणे, श्रावणी माळी, गार्गी कांबळे, श्राव्या पामे या लहानमुली उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहे. दररोज त्या सराव करत आहेत. या कलाकृतीसाठी मिलिंद रणपिसे यांनी दिग्दर्शन केले आहे. याशिवाय, एकपात्री सादरीकरण, महिलांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शन असे उपक्रम महिलांनी आयोजिले आहेत. 

एकूणच, अशा उपक्रमांतून आपोआपच सोसायटीतील कुटुंबात परस्परांविषयीचा स्नेहभाव वाढीस लागला आहे. महिला वर्गातील 'गॉसिंपिंग'चा प्रकार राहिलाच नाही, भगिनींची एकमेकींशी सुंदर मैत्री पाहायला मिळतेय आणि महत्त्वाचं म्हणजे एका कलाकाराकडून प्रेरणा घेऊन अनेक मंडळींना विविध कलांचा छंद जोपासलाय. म्हणूनच हरिश्चंद्रगड सोसायटीचे उदाहरण सर्वांसाठी अनुकरणीय आहे.  


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance