तळेगाव एमआयडीसी परिसरात बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
पिंपरी, ता. ११ - तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वराळे फाटा परिसरात महादेव मंदिरासमोर शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण रस्ता अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. भरधाव बसने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला असून बसचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालकास पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मनोज अरुण ठाकरे (वय २५, रा. भिमाशंकर कॉलनी, वराळे फाटा, ता. मावळ, जि. पुणे) यांचे मेव्हणे शेखर राजेंद्र बाविसकर (वय २८, मूळ रा. भोकर, जि. जळगाव) हे मोटारसायकलने नवलाख उंब्रे ते वराळे फाटा मार्गे जात होते. दरम्यान, महादेव मंदिराजवळ समोरून भरधाव वेगात येणाऱ्या बसने चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत शेखर बाविसकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने उपचारासाठी हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. आरोपी बसचालक सचिन दत्तात्रय हराळे (वय ३३, रा. खेड, जि. पुणे) याला अटक करण्यात आली आहे.
अपघातानंतर बसचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला होता. या प्रकरणी आरोपीविरोधात तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (ता. १०) भारतीय न्याय संहिता log(l) १२५ (अ), १२५ (ब) मोटार वाहन कायदाकलम १३४,१८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.