थेरगाव येथील ‘बटरफ्लाय गार्डन’च्या कामाची लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांकडून पाहणी
पिंपरी, ता. १६ - थेरगाव प्रभाग क्रमांक २३ येथे साकारत असलेल्या निसर्गरम्य ‘बटरफ्लाय गार्डन’च्या कामाची पाहणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी नुकतीच महापालिका अधिकाऱ्यांसमवेत केली. कामांचा सविस्तर आढावा घेतला. हे उद्यान अधिक सुंदर, स्वच्छ आणि सुविधायुक्त व्हावे या दृष्टीने बारणे यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या.
प्रामुख्याने महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची सोय करणे, उद्यानातील झाडांची संख्या वाढवणे आणि परिसरातील ड्रेनेज लाईनची पाहणी करून योग्य नियोजन लावण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बसण्याची उत्तम व्यवस्था, मुख्य प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक, पार्किंग आणि नियमित स्वच्छतेसाठी ठोस व्यवस्थापन प्रणाली (मेंटेनन्स शेड्युल) तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. उद्यानामध्ये पक्षांना आकर्षित करणारी स्थानिक फुलझाडे आणि औषधी वनस्पतींची लागवड करणे या बाबींची पूर्तता करण्यास सांगितले.
यावेळी, अधीक्षक योगेश वाळुंज, सहाय्यक उद्यान अधीक्षक राजेश वसावे, उद्यान निरीक्षक सुनील नाळे, उद्यान सहाय्यक हनुमंत चाकणकर, उद्यान विभागाचे अरविंद कदम, उपअभियंता रमेश निवृत्ती जिंतीकर, कनिष्ठ अभियंता विकास दत्तात्रेय गोसावी यांच्यासह माजी स्वीकृत नगरसेवक संदीपजी गाडे व प्रभागातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
बारणे म्हणाले, ''थेरगावचे हे बटरफ्लाय गार्डन शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे ठरेल. नागरिकांना एक स्वच्छ, सुंदर आणि सुविधायुक्त विरंगुळा केंद्र उपलब्ध करून देणे हे आमचे कर्तव्य आहे. उद्यानाचे काम दर्जेदार व वेळेत पूर्ण करण्याकडे आमचा कटाक्ष राहील.''