थेरगावमध्ये हातभट्टी दारु जप्त; महिला आरोपीवर गुन्हा दाखल
पिंपरी, ता. ४ - थेरगाव येथील संदिप नगर परिसरात बेकायदेशीर हातभट्टी दारू विक्रीप्रकरणी एका महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
थेरगाव येथील संदिप नगर परिसरात मंगळवारी (ता. ३) सकाळी सुमारे १०.४५ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. आरोपीच्या घराच्या आडोशाला छापा टाकून पोलिसांनी २५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यात पांढऱ्या रंगाच्या कॅनमध्ये साठवलेली सुमारे २५ लिटर गावठी हातभट्टी दारू आढळून आली.
सदर दारू विनापरवाना बेकायदेशीररित्या जवळ बाळगून चोरीछुप्या पद्धतीने विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून मंगळवारी (ता. ३) रोजी दुपारी ४.२३ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
महिला आरोपीस बी.एन.एस.एस. ३५(३) प्रमाणे नोटीस देण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरव करीत आहेत.
पोलिसांनी नागरिकांना बेकायदेशीर दारू विक्रीबाबत माहिती मिळाल्यास तत्काळ कळविण्याचे आवाहन केले आहे.