दारुचे बील भरण्यास नकार दिल्याने तिघांची मजूराला मारहाण
पिंपरी, ता. २९ - दारुचे बील भरण्यास नकार दिल्याने तिघांनी एका मजूराला मारहाण करुन जखमी केले. ही घटना बुधवारी (ता. २७) सायंकाळी थेरगाव येथील सचिन वाईन्स येथे घडली. काचेची फुटलेली बाटली मारणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत, मारहाण झालेले मजूर मारुती रामधन रुडे (वय-५१ वर्षे, बिगारीकाम, रा. पवारनगर, थेरगाव) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी चंदू (संपुर्णनाव माहित नाही, वय अंदाजे २५ वर्षे), दत्ता पाटेकर (वय अंदाजे २५ वर्षे) व त्यांचा अनोळखी मित्र यांच्यावर गुरुवारी (ता. २८) काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी मारुती रुडे यांनी आरोपी चंदू याला दारुचे बील भरण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरुन त्याने रुडे यांना हाताने मारहाण केली. चंदूच्या अनोळखी मित्रानेही रुडे यांना मारले. आरोपी दत्ता पाटेकर याने रिकामी बाटली फोडून रुडे यांच्या पाठीवर व डाव्या हातावर मारुन त्यांना जखमी केले आहे. दत्ता पाटेकर याला पोलिसांनी अटक केली आहे. तिन्ही आरोपींवर काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.