पवना जलवाहिनी प्रकल्पावर सर्व घटकांना विश्वासात घेऊन तोडगा काढा

पवना जलवाहिनी प्रकल्पावर सर्व घटकांना विश्वासात घेऊन तोडगा काढा

पिंपरी, दि. ९ सप्टेंबर २०२६ : पिंपरी-चिंचवड शहराच्या दीर्घकालीन पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या पवना जलवाहिनी प्रकल्पाबाबत सर्व संबंधित घटकांना विश्वासात घेऊन सकारात्मक आणि सर्वमान्य तोडगा काढावा, अशी मागणी महापौर रवि लांडगे यांनी केली. यासंदर्भात त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची भेट घेऊन मावळमधील शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीबाबत चर्चा केली.

दिशा समितीच्या बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले असताना महापौर लांडगे यांनी जिल्हाधिकारी डुडी यांची भेट घेतली. यावेळी पवना जलवाहिनी प्रकल्पासंदर्भात यापूर्वी झालेल्या बैठकीतील चर्चा, मावळ भागातील शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्या आणि प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

शेतकऱ्यांचे हित आणि शहराची पाण्याची गरज यांचा समन्वय साधणे आवश्यक असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. प्रकल्प पुढे नेताना मावळमधील शेतकरी, स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणांच्या अडचणींचा संवेदनशीलतेने विचार करून कोणावरही अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने तोडगा काढण्याची भूमिका त्यांनी मांडली.

पिंपरी-चिंचवड शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेता भविष्यातील पाणीपुरवठ्यासाठी शाश्वत नियोजन आवश्यक आहे. त्या दृष्टीने पवना जलवाहिनी प्रकल्प महत्त्वाचा असला तरी स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्नही योग्य पद्धतीने सोडविणे गरजेचे असल्याचे लांडगे यांनी सांगितले.

या विषयावर पुढील निर्णयप्रक्रियेला गती देण्यासाठी मुख्यमंत्री स्तरावर संयुक्त बैठक आयोजित करावी, अशी विनंतीही त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे केली. या बैठकीत संबंधित विभाग, जिल्हा प्रशासन, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि इतर यंत्रणांच्या उपस्थितीत प्रलंबित मुद्द्यांवर चर्चा करून पुढील दिशा निश्चित करता येईल, असे त्यांनी नमूद केले.

“शहराची दीर्घकालीन पाण्याची गरज पूर्ण करण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या हिताचे संरक्षण व्हावे, यासाठी सातत्याने पाठपुरावा करण्यात येईल,” असे महापौर रवि लांडगे यांनी सांगितले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories