प्रभाग क्र. २७ मध्ये अनधिकृत बांधकामे भुईसपाट, ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कारवाई
पिंपरी, ता. २ - प्रभाग क्र. २७ मधील वृंदावन कॉलनी, रहाटणी तसेच तापकीर मळा चौक, तापकीर नगर, रहाटणी या परिसरांमध्ये अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली. या कारवाईदरम्यान सुमारे ८८.८७ चौरस मीटर क्षेत्रफळावरील अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या ‘ग’ क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या आदेशान्वये, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘ग’ क्षेत्रीय अधिकारी किशोर ननवरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.
कारवाईवेळी उप अभियंता जयवंत रोकडे यांनी नियोजन केले. महापालिकेच्या धडक कारवाई पथकामध्ये बीट निरीक्षक किरण पवार, विनोद बजबळकर, दिग्विजय घोटकुले व ज्ञानराज खंडाळे यांचा समावेश होता.
या कारवाईसाठी आवश्यक मनुष्यबळ आणि यंत्रसामग्री सज्ज ठेवली होती. कारवाई दरम्यान एम.एस.एफ.चे १२ जवान, १ पोलिस कर्मचारी, महापालिकेचे ५ मजूर तसेच ठेकेदारामार्फत ४ मजूर उपस्थित होते. याशिवाय जेसीबी ब्रेकर १, ट्रॅक्टर ब्रेकर १ तसेच ४ हातोड्यांच्या सहाय्याने अनधिकृत बांधकामे भुईसपाट करण्यात आली.
शहरातील अनधिकृत बांधकामांविरुद्धची कारवाई महापालिका प्रशासनाकडून यापुढेही सातत्याने सुरु राहणार आहे. नागरिकांनी बांधकाम करताना नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे, असे यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले.