उत्तराखंड राज्यातील ८३ शिखरे गिर्यारोहण मोहिमांसाठी अधिकृतपणे खुली
पुणे, ता. ३ - उत्तराखंड राज्यातील ८३ हिमालयातील शिखरे उत्तराखंड सरकारने गिर्यारोहण मोहिमांसाठी अधिकृतपणे खुली केली आहेत. या निर्णयामुळे गिर्यारोहकांना अनेक साहसी, रोमहर्षक गिर्यारोहण मोहिमा राबवता येणार आहेत. येथे गिर्यारोहण मोहिम राबवताना सर्व गिर्यारोहकांना 'लीव्ह नो ट्रेस' म्हणजे 'कोणताही कचरा मागे न सोडणे...' हा नियम पाळणे बंधन कारक आहे.
उत्तराखंडमधील गिर्यारोहण मोहिमांसाठी भारतीय गिर्यारोहकांना शुल्क माफी असणार आहे. भारतीय गिर्यारोहकांना आता शिखर फी (Peak Fee), कॅम्पिंग शुल्क किंवा पर्यावरण शुल्क भरावे लागणार नाही. परदेशी गिर्यारोहकांना आता राज्याकडून लावले जाणारे अतिरिक्त शुल्क भरावे लागणार नाही. त्यांना केवळ IMF ने ठरवून दिलेले शुल्क भरावे लागणार आहे. सर्व मोहिमांसाठी उत्तराखंड माउंटेनियरिंग परमिशन सिस्टम (UKMPS) या ऑनलाइन पोर्टलवरून अर्ज करावा लागेल. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि वेगवान आहे, असे उत्तराखंड सरकारने सांगितले आहे. राज्य पर्यटन विकास परिषद (UTDB) आणि वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ही योजना राबवली जात आहे.
खुली केलेल्या प्रमुख शिखरांचे स्वरुप - ही शिखरे त्यांच्या नैसर्गिक सौंदर्यासोबतच तांत्रिकदृष्ट्या कठीण चढाईसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत.
- या मोहिमेत ५,७०० मीटरपासून ७,७५६ मीटर उंचीपर्यंतच्या आव्हानात्मक शिखरांचा समावेश आहे
- कामत शिखर (Kamet) - ७,७५६ मीटर आहे. हे सर्वात उंच शिखर आहे.
- इतर महत्त्वाची शिखरे ० नंदा देवी ईस्ट, चौखंबा ग्रुप, त्रिशूल ग्रुप, शिवलींग, सतोपंथ, चांगबांग, पंचाचुली आणि नीलकंठ.