स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या निगडी-प्राधिकरणात ग्रंथदान सोहळा व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
May 27 2026
38
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त उद्या निगडी-प्राधिकरणात ग्रंथदान सोहळा व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम
पिंपरी, ता. २७ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त तसेच निगडी-प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या ४३ व्या वर्धापन दिनानिमित्त मंडळाकडून गुरुवारी (ता. २८) ग्रंथदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रचलेल्या राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या प्रांगणात सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
ग्रंथदान सोहळ्यामध्ये, पुणे जिल्ह्याती तळेगाव, माले, वेल्हे, राजगुरुनगर, औताडेवाडी तसेच सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस येथील विश्व हिंदू परिषद संचिलत वाचनालयांना ग्रंथदान केले जाणार आहे. ज्ञानाचा प्रकाश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावा, वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी आणि नव्या पिढीमध्ये विचारांचे सामर्थ्य निर्माण व्हावे या उद्देशाने विशेष ग्रंथदान उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यानंतर, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या तेजस्वी राष्ट्रभक्तीपर गीतांचा कार्यक्रम गायिका नेहा कुलकर्णी व स्वरसाधक समूह सादर करणार आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे विचार, त्याग, राष्ट्रनिष्ठा आणि सामाजिक जागृतीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात शहरवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.