बांधकाम साईटवर देखरेख करणाऱ्या प्रतिनिधीला फावड्याने मारहाण, ताथवडेमधील घटना
Mar 13 2026
62
बांधकाम साईटवर देखरेख करणाऱ्या प्रतिनिधीला फावड्याने मारहाण, ताथवडेमधील घटना
पिंपरी, ता. १३ - ताथवडे येथील बांधकाम साईटवरील कामगारांच्या निवासस्थानी (लेबर कॅम्प) तेथे देखरेख करणाऱ्या प्रतिनिधीला चार मजूरांनी फावड्याने मारहाण केली. या मारहाणीत तो प्रतिनिधी गंभीर जखमी झाला. ही घटना ११ मार्चला ताथवडे येथील महिंद्रा हॅप्पीनेस बांधकाम साईटच्या लेबरकॅम्पमध्ये घडली आहे.
या प्रकरणी, अभिजीत अशोक पिसाळ (वय ३६ वर्षे, आकुर्डी) यांनी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तिघांना अटक केली आहे.
सुरज सुरेश चव्हाण (वय २८) असे गंभीर जखमी झालेल्या प्रतिनिधीचे नाव आहे. दिपक रॉय, अब्दुल कलीम, मोहम्मद सलीम व जावेद अहमद (सर्व वय अंदाजे ३० ते ३५, मूळ रा. उत्तर प्रदेश, सध्या रा. महिंद्रा हॅप्पीनेस लेबर कॅम्प, ताथवडे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी दिपक रॉय, अब्दुल कलीम व मोहम्मद सलीम यांना पोलिसांनी अटक केली आहे.
प्रतिनिधी सूरज चव्हाण व सुजय शिंदे हे बांधकाम साईटवर भांडण करणाऱ्या मजुरांना कॅम्प सोडून जाण्यास सांगण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपींनी सुरज चव्हाण यांच्यावर फावड्याने हल्ला केला.
या हल्ल्यात चव्हाण यांच्या उजव्या बाजूचे नाक कापले गेले, वरचा ओठ तसेच जबड्याला गंभीर दुखापत झाली आहे.
आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.