वाकडमधील प्रिस्टीन प्रोलाईफ सोसायटीत रुफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित, रहिवाशांचा पुढाकार
पिंपरी, ता. ७ - वाकडमधील प्रिस्टीन प्रोलाईफ फेज - ३ सोसायटीत नुकताच १२० किलोवॅट क्षमतेचा रुफटॉप सौर ऊर्जा प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित करण्यात आला. या प्रकल्पाचे उद्घाटन स्थानिक नगरसेवक राहुल कलाटे यांच्या हस्ते झाले. केवळ चार महिन्यांत महावितरणच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करुन हा प्रकल्प पूर्णत्वास गेला. प्रकल्पासाठी सोसायटीला २१.६७ लाख रुपयांचे सरकारी अनुदान मिळाले. आता या प्रकल्पाद्वारे महिन्याला वीजबिलामध्ये २.३० लाख रुपयांची बचत होणार आहे.
सदर प्रकल्पासाठी सोसायटीच्या सभासदांनी प्रत्येकी ७००० रुपयांची वर्गणी जमा केली होती. सामूहिक प्रयत्नांनी हा प्रकल्प आता प्रत्यक्षात आला आहे. या प्रकल्पातून सोसायटीच्या वीजबिलात दर महिन्याला सुमारे २ लाख ३० हजार इतक्या वीज बिलाची बचत होणार असल्याने सोसायटीवरील आर्थिक भार कमी होणार आहे.
प्रिस्टीन प्रोलाइफ फेज ३ सोसायटीचा हा उपक्रम शाश्वत विकासाच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण व अनुकरणीय पाऊल ठरेल, असे म्हणत राहुल कलाटे यांनी सोसायटीच्या सदस्यांचे कौतुक केले. हरित ऊर्जा हेच भविष्यातील ऊर्जा स्त्रोत असून नागरी विकासासोबत पर्यावरणाचा समतोल राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे, असे कलाटे म्हणाले.
प्रकल्पाबाबत सांगताना, सोसायटीचे अध्यक्ष अल्केश चरपे म्हणाले की, ''सुरुवातीला सर्व सदनिका धारकांना विश्वासात घेऊन त्यांना संपूर्ण उपक्रमाचा फायदा समजावून सांगितला. त्यामुळे सर्वांनी वर्गणी देऊन या प्रकल्पाला गती दिली.'' ''सौर प्रकल्पामुळे सोसायटीच्या वीज खर्चात लक्षणीय बचत होणार असून पर्यावरणपूरक व शाश्वत ऊर्जेच्या वापराला मोठी चालना मिळणार आहे. '', असे मत सोसायटीचे सचिव स्वरुप पाटील यांनी सांगितले. यावेळी, खजिनदार अरविंद, अनुराग शिरोडे, भीवाजी सूर्यवंशी, श्रीधर घरपुरे, प्रशांत गोरे, अनुराग तिवारी तसेच इतर सोसायटी सदस्य व रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.