पिंपरी-चिंचवड : वाकड-थेरगाव परिसरातील भगवती रॉयल हौसिंग सोसायटीत नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसोबत सायबर सुरक्षा, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि सामाजिक जागृती यांचा संदेश देण्यात आला. सोसायटीच्या उत्सव मंडळाने महिला आणि मुलांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून सामाजिक एकतेचा उपक्रम राबवला.
या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे, तर प्रमुख पाहुणे म्हणून पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल वडघुले उपस्थित होते.
विठ्ठल साळुंखे यांनी मोबाईल बँकिंगमधील फसवणूक, सोशल मीडियाचा सुरक्षित वापर आणि सायबर गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची खबरदारी याविषयी मार्गदर्शन केले. पालकांनी मुलांशी दररोज संवाद साधणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी मुलांच्या मानसिक स्वास्थ्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले.
सोसायटीतील रहिवासी डॉ. अमोल पाटील यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचे वाढते महत्त्व स्पष्ट केले. त्याचबरोबर मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण पिढीवर होणाऱ्या परिणामांविषयी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात योगेश पाटील यांनी सार्वजनिक सणांमुळे शेजाऱ्यांमधील संवाद वाढतो, एकटेपणा कमी होण्यास मदत होते आणि मुलांच्या कलागुणांना व्यासपीठ मिळते, असे सांगितले.
या नवरात्रोत्सवात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला. पारंपरिक हिरव्या साड्या परिधान करून महिलांनी दांडियाचा आनंद घेतला. विशेष म्हणजे, बाहेरील व्यावसायिक संस्थांची मदत न घेता मंडपाचा देखावा, विद्युत रोषणाई आणि स्टेज उभारणी सोसायटीतील स्वयंसेवकांनी केली.
सोसायटीत २०१२ पासून ‘एक सोसायटी, एक उत्सव’ ही परंपरा जपली जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच २०१९ मधील महापुराच्या काळात सोसायटीतील सदस्यांनी पूरग्रस्तांना मदत केल्याच्या उपक्रमाचीही आठवण यावेळी सांगण्यात आली.
उत्सवाचे नियोजन मंडळाचे अध्यक्ष मयूर पवार आणि उपाध्यक्ष उमेश पेंडभाजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी चिंतन कंसारा, संदीप भारद्वाज, मनोज चौधरी, सतीश कोलगे यांच्यासह अमोल वाघ, प्रभाकर कुमार, मयंक अग्रवाल, राहुल दसरे, अविनाश देशमुख आणि राहुल जहागीरदार यांनी सहकार्य केले.
सांस्कृतिक उत्सवातून सामाजिक एकता वाढविण्याबरोबरच नागरिकांना डिजिटल सुरक्षेबाबत जागरूक करण्याचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.