प्रभागस्तरावरील कामकाज अधिक गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी समन्वय बैठक
पिंपरी, ता. १४ जुलै २०२६ - प्रभागस्तरीय कामकाज, नागरिकांच्या मूलभूत समस्या, विकासकामांचा पाठपुरावा तसेच प्रशासनाशी प्रभावी समन्वय या अनुषंगाने पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व प्रभाग समिती अध्यक्षांसमवेत महापौर रवी लांडगे यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.
प्रभाग समिती ही नागरिक आणि महापालिका प्रशासन यांच्यातील महत्त्वाचा दुवा आहे. नागरिकांच्या प्रश्नांची प्रभागस्तरावरच तातडीने दखल घेऊन त्यावर कालबद्ध कार्यवाही व्हावी, विकासकामांना गती मिळावी आणि प्रत्येक प्रभागात नागरिकाभिमुख कामकाज प्रभावीपणे राबविण्यात यावे, याबाबत सविस्तर चर्चा केली.
अभिषेक बारणे यांनी प्रभागातील अत्यावश्यक नवीन कामे अंदाजपत्रकात तातडीने समाविष्ट करून घेण्यावर भर दिला. यामध्ये महापालिकेच्या हॉस्पिटलला भेट देऊन 'हेल्प डेस्क' तयार करणे, मोठ्या सोसायट्यांमध्ये 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'ची पाहणी करणे आणि शहरातील ३२ प्रभागांत बोरवेलच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याची (Recharging) मोहीम राबवण्याचे आदेश दिले. तसेच प्रभाग कार्यालयांत नागरिक सुविधा केंद्र, आधार कार्ड आणि एक खिडकी योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
महापालिकेच्या शाळांना भेटी देऊन तिथल्या प्राथमिक गरजा पूर्ण करणे, वृक्षारोपणासाठी जागा निश्चित करणे आणि झाडांच्या बुंध्याभोवतीचे कॉंक्रिट काढून झाडे मोकळी करण्यावर भर दिला. पुलांखालील 'स्नॅक्स सेंटर्स'च्या ठिकाणची स्वच्छता राखून तिथे शौचालय व्यवस्था व्यवस्थित ठेवण्याचे निर्देश देत, प्रभाग अध्यक्षांनी पर्यावरणाचे रक्षण आणि बचतीसाठी इलेक्ट्रिक कारचा वापर करावा, अशी महत्त्वपूर्ण सूचना सभापती अभिषेक बारणे यांनी केली.
या बैठकीत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे प्रभाग समिती अध्यक्षांच्या कामकाजात एक नवीन दिशा मिळाली असून, पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे पदाधिकारी आता अधिक जोमाने काम करण्यास सज्ज झाले आहेत. महापौर रवी लांडगे यांनीही सर्व पदाधिकाऱ्यांना प्रभागातील विकासकामांसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, प्रभाग समिती अध्यक्षा अर्चनाताई कारंडे, मंदारजी देशपांडे, निखिल बोऱ्हाडे, सविता खुळे, मनीषा पवार, तृप्ती कांबळे, आरती चोंधे व रेखा देवकर उपस्थित होते. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रभाग समित्यांचे कामकाज अधिक सक्षम, गतिमान आणि परिणामकारक करण्यावर आमचा भर राहील, असे महापौर रवी लांडगे यांनी सांगितले.
या बैठकीत मिळालेल्या मार्गदर्शनामुळे प्रभाग समिती अध्यक्षांच्या कामकाजात एक नवीन दिशा मिळाली असून, पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी हे पदाधिकारी आता अधिक जोमाने काम करण्यास सज्ज झाले आहेत. महापौर रवी लांडगे यांनीही सर्व पदाधिकाऱ्यांना प्रभागातील विकासकामांसाठी पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.