छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीकडून 97 लाखांचे सोन्याचे दागिने उकळले; आरोपीला अटक
पिंपरी : तरुणीसोबत असलेली एकत्रित छायाचित्रे तिच्या कुटुंबीयांना दाखवण्याची आणि समाजमाध्यमांवर व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत तब्बल 97 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने उकळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्रीती दिलीप ताराणी (वय 24, व्यवसाय—शिक्षण, रा. वैष्णव माता मंदिराजवळ, पिंपरी, पुणे) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून भावेश प्रदीप लखवानी (वय 25, रा. अशोक थिएटरजवळ, पिंपरी, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीला वारंवार फोन करून अशोक थिएटर परिसरात बोलावून घेतले. आरोपीकडे त्याचे आणि फिर्यादीचे एकत्रित छायाचित्रे होती. ही छायाचित्रे फिर्यादीच्या कुटुंबीयांना दाखवण्याची धमकी त्याने दिल्याचा आरोप आहे.
छायाचित्रे सार्वजनिक करून समाजामध्ये बदनामी केली जाईल, असे सांगत आरोपीने फिर्यादीवर मानसिक दबाव निर्माण केला. या भावनिक दबावाचा आणि धमकीचा वापर करून आरोपीने फिर्यादीकडे सोन्याची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीची इच्छा नसतानाही बदनामीच्या भीतीमुळे तिने वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये आरोपीला सोन्याचे दागिने दिल्याचा आरोप आहे. या दागिन्यांची एकूण किंमत सुमारे 97 लाख रुपये असल्याचे फिर्यादीने पोलिसांना सांगितले. आरोपीने दागिने परत न करता आणखी दबाव टाकल्याने फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेतली.
तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. आरोपीने दागिन्यांचे नेमके काय केले, ते कुठे ठेवले किंवा विकले का, याचा तपास केला जात आहे. मोबाइलमधील संभाषण, संदेश, छायाचित्रे आणि आर्थिक व्यवहारांची माहितीही तपासली जात आहे.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 658/2026 नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार पुढील तपास सुरू आहे.