गॅस सिलींडरच्या टाकीने मारुन कामगाराची हत्या, मोशीतील बांधकाम साईटवरील घटना
पिंपरी, ता. ११ - कोणत्यातरी कारणावरुन मोशी येथे बांधकाम प्रकल्पावर काम करणाऱ्या एका कामगाराची त्याचा नातेवाईक तरुणाने गॅस सिलींडरच्या टाकीने मारुन हत्या केली आहे. ही घटना सोमवारी (ता. ९) बांधकाम प्रकल्पावरील पत्र्याच्या खोलीत घडली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे व त्याच्याविरोधात एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणात अनिकेत विनायक भुरे (वय २१, रा. पुनावळे, पिंपरी-चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ९ ते ११.३० वाजण्याच्या दरम्यान शंकेश्वर स्पर्श या बांधकाम प्रोजेक्टमधील ‘सी’ बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरील लेबर कॅम्पमध्ये पार्किंग क्रमांक पी-२-६४ येथे असलेल्या पत्र्याच्या खोलीत ही हत्या झाली. हत्या करणारा आरोपी प्रदिप विठठल गुंडरे (वय ३१ वर्षे, हल्ली रा. मोशी) याला पोलिसांनी अटक केली आहे. मृत कामगाराचे नाव बालाजी मारोती रेड्डी खंदाडे (वय २९) असे आहे.
मयत बालाजी व आरोपी प्रदीप हे दोघे एकाच बांधकाम प्रकल्पावर काम करत होते व दोघे नातेवाईकही होते. त्या दोघांमध्ये कोणत्यातरी कार वाद झाला. या वादातून आरोपीने सिलेंडरच्या टाकीने बालाजी खंदाडे याला मारहाण केली. या मारहाणीत बालाजी गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.
आरोपीविरोधात मंगळवारी (ता. १०) भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहेत. आरोपी अटकेत आहे.