news
clock

रहाटणी येथे अपघातानंतर तरुणावर जीवघेणा हल्ला

पिंपरी, ता. ११ - रहाटणी परिसरातील स्पॉट 18 मॉलसमोरील बीआरटी रोडवर अपघातानंतर एका तरुणावर चौघांनी मिळून जीवघेणा हल्ला केला. ही घटना सोमवारी (ता. ९) घडली आहे. या प्रकरणी आरोपींविरोधात मंगळवारी (ता. १०) काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत कुणाल विलास पालवे (वय २७, रा. रहाटणी) यांनी तक्रार दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. ९) रात्री सुमारे ९.२० च्या सुमारास स्पॉट 18 मॉलसमोर, बीआरटी रोडवरुन कुणाल पालवे हे शिवार चौकातून त्यांच्या  दुचाकीवरून जगताप डेअरी चौकाच्या दिशेने जात होते. त्यावेळी स्पॉट 18 मॉलसमोर समोरुन येणाऱ्या पल्सर मोटारसायकलची आणि त्यांची धडक झाली व पालवे हे रस्त्यावर खाली पडले.

त्याचवेळी काळ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून आलेल्या आरोपींनी अपघाताची चूक पालवे यांचीच असल्याचे म्हणत त्यांच्याशी वाद घातला. या दरम्यान आरोपी बाबू पाटील (वय अंदाजे ३०, रा. काळेवाडी) याने पालवे यांचा गळा दाबून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.  त्याच्या एका साथीदाराने कमरेचा बेल्ट काढून पालवे यांच्या डोक्यावर, तोंडावर आणि संपूर्ण शरीरावर मारहाण केली. इतर आरोपींनीही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत त्यांना गंभीर जखमी केले.

या प्रकरणी बाबू पाटील, अभिषेक माडगुळे (वय अंदाजे २२), विकी सुतार (वय अंदाजे ३०) व आणखी एका अज्ञात व्यक्तीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१), ३५२, ११५(२) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories