ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ९४ लाख रुपयांची फसवणूक
पिंपरी, ता. ६ - ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये चिखली येथील व्यावसायिकाची तब्बल १ कोटी ९४ लाख १४ हजार ५/- रुपयांची फसवणूक झाली आहे. हा प्रकार ७ जानेवारी २०२४ ते २८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत घडला आहे. या प्रकरणी आरोपी आदित्य ठाकूर याच्यावर चिखली पोलिस ठाण्यात गुन्हा काल (ता. ५ फेब्रुवारी) दाखल केला आहे.
गोविंद विश्वनाथ मुळे (वय ४० वर्षे, व्यवसाय, रा. चिखली) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी मुळे यांना टेलीग्राम अकाउंटवर एक लिंक पाठवली. त्यानंतर, आपण वेंटेज ग्रुपचे एरिया मॅनेजर असल्याचे सांगून वेटेंजअॅपमध्ये ट्रेडिंग केल्यास आर्थिक फायदा होइल असे अमिष दाखवले. पुढे, फिर्यादी मुळे यांच्याकडून वेगवेगळया युपीआय आयडीवर पैसे घेतले, त्यांना टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील करुन त्यांच्याकडून ट्रेडिंग करुन घेतले. नंतर त्यांचा आयडी ब्लॉक करुन त्यांची तब्बल १ कोटी ९४ लाख १४ हजार ५/- रुपयांची फसवणूक केली.
वेंटेज ट्रेडिंग ग्रुपचा एरिया मॅनेजर आदित्य ठाकूर याच्याविरोधात पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ३१८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. आरोपीचे पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही व आरोपीला अद्याप अटक केली नाही. पोलिस पुढील तपास करत आहे.
--------------------------------------------------------------------------------------------