''शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व एकत्र काम करु'' - सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे
नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांचे केले अभिनंदन
पिंपरी, ता. ६ - ''पिंपरी-चिंचवड महापालिकेवर असलेली प्रशासकीय राजवट आज संपुष्टात आली आहे. नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या निवडीने शहरात पुन्हा एकदा लोकाभिमुख कारभाराचे पर्व सुरु झाले आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली हे नवीन सभागृह शहराच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देईल. सभागृहात मतभेद असू शकतात. परंतु, मनभेद न ठेवता शहराच्या विकासासाठी आम्ही सर्व एकत्र काम करु.'' असा ठाम विश्वास सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी व्यक्त केला.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आज शुक्रवारी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये महापौर व उपमहापौरांची निवड करण्यात आली. सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांचे अभिनंदन केले व बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार उमा खापरे, आमदार अमित गोरखे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
शितोळे म्हणाले, ''आज महापौर आणि उपमहापौरांच्या निवडीमुळे सामान्यांच्या आवाजाला सभागृहात स्थान मिळाले आहे. नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर सभागृहाचे कामकाज शिस्तबद्ध, पारदर्शक व लोकाभिमुख ठेवतील. सभागृहातील प्रत्येक सदस्याला शहराच्या हितासाठी बोलण्याची समान संधी मिळेल याची आम्हाला खात्री आहे. पिंपरी-चिंचवड हे केवळ लोकसंख्येने मोठे शहर नाही, नियोजनबद्ध विकास आणि शिस्तीमुळे देशात आदर्श ठरले आहे. भाजपाला नागरिकांच्या पाठिंब्याने जे मोठे यश मिळाले आहे, तो विश्वास हे सभागृह सार्थ ठरवेल. मेट्रो, पायाभूत सुविधा आणि आयटी क्षेत्रातील प्रगतीला आता अधिक गती दिली जाईल.''