जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणुकीसाठी उद्या मतदान
पिंपरी, ता. ६ - जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी शनिवारी (ता. ७) मतदान होणार आहे. जिल्ह्यात एकूण ३ हजार ६०५ मतदान केंद्र आहेत. मतदारांची एकूण संख्या २९ लाख ७२ हजार ३५९ आहेत. यामध्ये, त्यामध्ये पुरुष मतदार १५ लाख २२ हजार २५६, स्त्री मतदार १४ लाख ५० हजार १४ आणि इतर ९१ मतदार आहेत. सर्व मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया १६ जानेवारीपासून सुरू झाली. अर्ज भरण्याची अंतिम मुदत २१ जानेवारी होती. २८ जानेवारीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यानंतर, तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला. निवडणूक आयोगाने मतदानाची तारीख ५ फेब्रुवारीवरुन ७ फेब्रुवारी केली. जिल्हा परिषदेसाठी एकूण २९९ उमेदवार तर पंचायत समितीसाठी ५२८ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत.
राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांसाठी ही निवडणूक होत आहे. उद्या सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू करण्यात येईल.
-------------------------------------------------------------------------------------------