दापोडी | 15 सप्टेंबर 2026 : सीएमई गेटसमोरील परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून रिअल इस्टेट व्यावसायिकावर धारदार कुकरीने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. हल्लेखोराने जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. दापोडी पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या प्रयत्नासह विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवला आहे.
या प्रकरणी विलास बबन हजारे वय ५५ रा. दापोडी यांनी फिर्याद दिली असून वजय चिंतामण शिंदे वय ४७ रा.दापोडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 13 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास हॉटेल संजना चायनीजजवळ, सीएमई गेटसमोर घडली. फिर्यादी हे फोनवर बोलत असताना आरोपी त्यांच्याजवळ आला. जुन्या भांडणाच्या कारणावरून त्याने शिवीगाळ करत स्वतःकडील धारदार कुकरीने फिर्यादीच्या डोक्यावर जोरात वार केला.
या हल्ल्यामुळे फिर्यादी खाली पडले. त्यानंतर आरोपी पुन्हा त्यांच्या जवळ आला आणि वार करण्याचा प्रयत्न करू लागला, असे तक्रारीत नमूद आहे. “आज तुला जिवंत सोडणार नाही,” अशी धमकी देत आरोपीने हल्ला सुरू ठेवला, असा फिर्यादीचा आरोप आहे. त्यावेळी फिर्यादींचा मित्र दीपक कानडे यांनी मध्यस्थी करून आरोपीला अडवण्याचा प्रयत्न केला.
मात्र, आरोपीने कानडे यांनाही जोराचा धक्का देऊन बाजूला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपीने फिर्यादीच्या दोन्ही हातांवर कुकरीने वार केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात फिर्यादी गंभीर जखमी झाले. हल्ल्यानंतर आरोपीने शस्त्र दाखवून परिसरातील नागरिकांमध्ये भीती निर्माण केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. जुन्या वादातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, वादाचे नेमके कारण काय होते, आरोपीने हल्ल्याची पूर्वतयारी केली होती का आणि हल्ल्यात वापरलेले शस्त्र कोठून आणले, याचा तपास पोलीस करत आहेत. परिसरातील सीसीटीव्ही चित्रण आणि प्रत्यक्षदर्शींचे जबाब तपासाचा भाग असतील.
या प्रकरणी दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 305/2026 नोंदवण्यात आला आहे. खुनाचा प्रयत्न, दुखापत, धमकी, शिवीगाळ तसेच शस्त्र आणि महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार पुढील तपास सुरू आहे.