निगडी ओटास्कीममध्ये धारदार कोयत्यांसह दोन तरुणांना अटक

निगडी ओटास्कीममध्ये धारदार कोयत्यांसह दोन तरुणांना अटक

निगडी | ३१ ऑक्टोबर २०२६ : पिंपरी-चिंचवडमधील निगडी परिसरात धारदार लोखंडी कोयते बाळगणाऱ्या दोन २५ वर्षीय तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. शहरात पोलीस आयुक्तांचे मनाई आदेश लागू असतानाही संबंधित तरुणांनी अवैधरीत्या धारदार कोयते बाळगल्याचा आरोप आहे. या दोन्ही घटना निगडीतील सेक्टर क्रमांक २२ मधील ओटास्कीम परिसरात उघडकीस आल्या असून, निगडी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून ३० मिनिटांच्या सुमारास सेक्टर क्रमांक २२ मधील मोकळ्या मैदानाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, स्मशानभूमीजवळ कारवाई करण्यात आली.

या प्रकरणात साहिल संजय शिंदे (वय २५ वर्षे, चिखली, पुणे) आणि सागर रंगनाथ पोटभरे (वय २५ वर्षे, अंजठानगर, चिंचवड, पुणे) यांना धारदार लोखंडी कोयता बाळगल्याप्रकरणी पकडण्यात आले.

याबाबत पोलीस शिपाई दीपक गुणवंत पिसे आणि पोलीस शिपाई किशोर दगडू घोरपडे (नेमणूक निगडी पोलीस ठाणे) यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी अनुक्रमे गुन्हा क्रमांक ९९४/२०२६,  गुन्हा क्रमांक ९९५/२०२६ दाखल करण्यात आला आहे.

दोन्ही प्रकरणांतील फिर्यादीनुसार, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तांनी २१ ऑक्टोबर २०२६ रोजी मनाई आदेश जारी केला होता. हा आदेश २८ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १२ वाजून १ मिनिटापासून १० नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

या आदेशानुसार, पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात शस्त्रे, तलवारी, भाले, लाठ्या, बंदुका किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.

मात्र, साहिल शिंदे आणि सागर पोटभरे यांनी प्रत्येकी एक धारदार लोखंडी कोयता बाळगून या आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. 

या दोन्ही प्रकरणांत भारतीय हत्यार कायद्यातील कलम ४(२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम ३७(१)(३) सह १३५ अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणांचा पुढील तपास निगडी पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories