पिंपरी | ३१ ऑक्टोबर २०२६ : भारत आणि झांबिया यांच्यातील उच्च शिक्षण, संशोधन आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने झांबिया सरकारच्या शिष्टमंडळाने पिंपरी-चिंचवड विद्यापीठाला (PCU) सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान विद्यार्थी व प्राध्यापक देवाणघेवाण, संयुक्त संशोधन आणि भविष्यातील शैक्षणिक भागीदारीच्या संधींबाबत चर्चा करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (PCET) साते, वडगाव मावळ येथील पिंपरी-चिंचवड विद्यापीठात आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्य दिनानिमित्त या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी झांबिया सरकारच्या शिष्टमंडळातील क्रेडिट्स अँड स्कॉलरशिप्स विभागाचे उपसंचालक डेरिक चिसांगा आणि व्यवस्थापक फ्लेमिंग मुकोशा उपस्थित होते.
विद्यापीठाच्या वतीने कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे, आंतरराष्ट्रीय संबंध संचालक डॉ. शंकर देवसरकर, संशोधन व विकास संचालक डॉ. भरत काळे, केनिया येथील मार्केटिंग मॅनेजर निशा कोटक, आंतरराष्ट्रीय प्रवेश व्यवस्थापक रचना पहुजा आणि डॉ. रामदास बिरादार उपस्थित होते.
या भेटीदरम्यान भारत आणि झांबिया यांच्यात दीर्घकालीन शैक्षणिक सहकार्य विकसित करण्यासाठी भविष्यात सामंजस्य करार (MoU) करण्याच्या शक्यतेवर चर्चा झाली. तसेच दोन्ही देशांतील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे आणि प्राध्यापकांना ज्ञान व संशोधनाचा अनुभव सामायिक करण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यावर भर देण्यात आला.
यावेळी कुलगुरू डॉ. संतोष सोनवणे यांनी भारत आणि झांबिया यांच्यातील उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रातील सहकार्य वाढविणे आवश्यक असल्याचे सांगितले. झांबियाच्या शिष्टमंडळाची ही भेट भविष्यातील शैक्षणिक भागीदारीच्या संधींचा विस्तार करण्यासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना जागतिक अनुभव मिळावा, प्राध्यापकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले ज्ञान आणि कौशल्य सामायिक करता यावे, तसेच शैक्षणिक संस्थांना संयुक्त संशोधन आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांसाठी नवीन संधी उपलब्ध व्हाव्यात, या उद्देशाने विद्यापीठ प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या भेटीचे आयोजन पीसीयूचे कुलपती तथा पीसीईटीचे विश्वस्त हर्षवर्धन पाटील, ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, व्यवस्थापन समिती सदस्य अजिंक्य काळभोर, नरेंद्र लांडगे आणि कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
आंतरराष्ट्रीय शैक्षणिक सहकार्याच्या माध्यमातून ज्ञान, संशोधन आणि कौशल्य विकासाला चालना देण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. झांबियाच्या शिष्टमंडळाच्या भेटीमुळे दोन्ही देशांतील शैक्षणिक संस्थांमध्ये भविष्यातील सहकार्याच्या शक्यता निर्माण झाल्या आहेत.