ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

पिंपरी, ता. ९ -  भरधाव वेगात असलेल्या आयशर ट्रकने दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून मागे बसलेल्या त्याच्या नातेवाईक महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (ता. ८) कासारवाडी येथील भोसरीकडून सांगवीकडे जाणाऱ्या उड्डाणपूलावर घडली आहे. ट्रकचालक अपघाताच्या ठिकाणहून निघून गेला आहे.

याबाबत, वैभव सुभाष ठोंबरे (वय ३२ वर्षे, बांधकाम व्यवसाय, रा. जिल्हा नाशिक) यांनी दापोडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास प्रशांत दशरथ शिंदे (वय २८ वर्षे) हा तरुण नातेवाईकांसह दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी आरोपी ट्रकचालकाने त्याच्या ताब्यातील आयशर ट्रक भरधाव वेगाने, बेदरकारपणे चालवून प्रशांतच्या दुचाकीला जोरात धडक दिली. ते गाडीवरुन कोसळून प्रशांत गंभीर जखमी झाला व त्याची वहिनी पूजा रोशन ठोंबरे (वय ३२) हीचा जागीच मृत्यू झाला व त्यांच्यासोबत असलेल्या लहान मुलीलाही किरकोळ दुखापत झाली आहे. 

दापोडी पोलिस पळून गेलेल्या ट्रकचालकाचा शोध घेत आहेत. त्याच्याविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १०६ (१), १२५ (अ),१२५ (ब), २८१, मोटार वाहन कायदा, १९८८ चे कलम ११९/१७७, १८४,१३४/१८७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance