ट्रेडींग-स्टॉक मार्केटमध्ये ४० लाखांची फसवणूक
पिंपरी, ता. ५ - ट्रेडींग आणि स्टॉक मार्केटमध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून चिंचवड येथील नोकरदाराची तब्बल ४० लाख ०९ हजार १६४/- रुपयांची फसवणूक झाली आहे. ही घटना नोव्हेंबर २०२५ ते जानेवारी २०२६ या कालावधीत घडली आहे.
याबाबत, रत्नाकर कमलाकर कुलकर्णी (वय ४२ वर्षे, नोकरी, रा. चिंचवडगाव) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फसवणूकीच्या घटनेत सुरेश शुक्ला नामक इसम व अन्य दोन मोबाईल क्रमांक धारक आरोपी आहेत. आरोपींनी फिर्यादीला ट्रेडिंग व स्टॉक मार्केटिंगमध्ये पैसे भरल्यास जादा परतावा देण्याचे आमिष दाखवले. एकूण ४०,०९,१६४/- रूपये इतकी रक्कम आरोपीकडील वेगवेगळ्या बँकखात्यात जमा करण्यास सांगितले. मात्र, त्या बदल्यात फिर्यादीस कोणताही परतावा न देता किंवा फिर्यादीकडुन घेतलेली रक्कम परत न देता फिर्यादीची मोठी आर्थिक फसवणूक केली आहे.
पोलिस पुढील तपास करत आहेत. आरोपीवर चिंचवड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३१९ (२), ३१८ (४), माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (सी), ६६ (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.