निगडीतील व्यापारी इमारतीतील गाळ्याची दयनीय अवस्था, नगरसेवक राजू मिसाळ यांच्या पुढाकाराने गाळ्याची स्वच्छता
पिंपरी, ता. २ - निगडी गावठाणातील (प्रभाग १५ मधील) अगरवाल चेंबर्समधील क्रमांक ३ हा व्यावसायिक गाळा गेल्या २३ वर्षांपासून बंद अवस्थेत होता. तीन वर्षांपूर्वी पालिकेच्या करसंकलन विभागाने थकबाकीमुळे हा गाळा सीलबंद केला होता. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून शेजारील व्यापाऱ्यांना कुबट व कुजक्या दुर्गंधीचा तीव्र त्रास सहन करावा लागत होता. हा गाळा उघडला असता त्याची दयनीय स्थिती दिसून आली.
सदर गाळ्याच्या या परिस्थितीबाबत सामाजिक कार्यकर्ते अरुण थोरात आणि स्थानिक व्यापाऱ्यांनी नगरसेवक राजू मिसाळ यांच्याकडे तक्रार केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून मिसाळ यांनी निगडी विभागीय कार्यालयाचे प्रशासन अधिकारी देशपांडे यांच्याशी संपर्क साधत लेखी पत्रव्यवहार करून तात्पुरत्या स्वरुपात गाळा उघडण्याची विनंती केली. प्रशासनाने तातडीने हालचाल करत सीलबंद गाळा उघडण्यास परवानगी दिली.
गाळा उघडल्यानंतर आत अत्यंत बिकट परिस्थिती आढळली. साफ-सफाईदरम्यान कबुतरांती सुमारे दहा पोती विष्ठा गोळा करण्यात आली. अनेक कबुतरे, उंदीर व घुशी मृत अवस्थेत सापडले. त्यानंतर कीटकनाशक विभागाकडून तातडीने औषध फवारणी करण्यात आली, त्यामुळे परिसरातील दुर्गंधी कमी होण्यास मदत झाली. नगरसेवक राजू मिसाळ यांनी स्वखर्चाने सफाई कर्मचारी उपलब्ध करुन देत संपूर्ण गाळ्याची स्वच्छता करुन घेतली. त्यांच्या तत्परतेमुळे व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळाल्याची भावना उपस्थित व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.
नागरीकांनी हेल्पलाईन क्रमांक 6262225151 चा लाभ घ्यावा, असे आवाहन राजू मिसाळ यांनी केले आहे.