पिंपरी रोटरी क्लबने खेड तालुक्यातील गावांमध्ये केल्या सुधारणा
पिंपरी, ता. ४ - 'पिंपरी रोटरी क्लब ऑफ पिंपरी'तर्फे 'हॅप्पी व्हिलेज' प्रकल्पांतर्गत खेड तालुक्यातील खारपूर आणि खोपेवाडी या दोन आदिवासी गावांमध्ये विविध विकासप्रकल्प राबवले. बायफ संस्था आणि टाटा मोटर्स यांच्या सहकार्याने सहकार्याने पिंपरी रोटरी क्लबने कार्यान्वितच केलेल्या या प्रकल्पांसाठी सुमारे १ कोटी २ लाख रुपये खर्च आला आहे.
सदर, विकास प्रकल्पांमध्ये गावांमध्ये बंधारे व विहीरी बांधून मुबलक पाणी उपलब्ध करुन दिले. सौर उर्जेवर जलउपसा प्रकल्प कार्यान्वित केला. शेतीसाठी आधुनिक प्रशिक्षण देण्यात आले व त्यामध्ये बांबू-आंबा-भात लागवड करण्यात आली, पशुपालनाबाबत मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय, गावातील. शैक्षणिक सुविधांबाबत पाहणी करण्यात आली व नागरीकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
या कार्यक्रमांना माजी प्रांतपाल माधव बोराटे, कैलास मोंगा, क्लबचे अध्यक्ष संपत आनंद, सचिव रोहन रोकडे, प्रकल्प संचालक धनंजय भिंगे, माजी अध्यक्षा डॉ. विभा झुत्शी, बायफचे सागर कडव, रोहित सरोज, राजश्री जोशी उपस्थित होते. माधव बोराटे म्हणाले, "शेती करण्यासाठी भांडवल, कौशल्य आणि ज्ञानाची कमतरता आहे. शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध झाल्यास शेती परवडणारा व्यवसाय होऊ शकतो. त्यासाठी आदिवासी भागातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे." यावेळी शेतकऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.
कुशल शहा व ख्याती शहा यांनी सूत्रसंचालन केले. बाबा भापकर यांनी आभार मानले.
--------------------------------------------------------------------------------------