मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर पलटी, वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली 

पिंपरी, ता. ४ - मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आडोशी बोगद्याजवळ काल, मंगळवारी (ता. ३) सायंकाळी प्रोपोलिन गॅस टँकर उलटलून गॅसची मोठी गळती सुरु झाली. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक तात्काळ थांबवण्यात आली. परिणामी गेले १५ तास द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्ग प्रशासनाने द्रुतगती महामार्ग आणि जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH-48) या दोन्ही मार्गांवर ‘सेफ्टी हॉल्ट’ जाहीर केला आहे व प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे.  

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा टँकर पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात होता. आडोशी बोगद्याजवळील अवघड वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकर थेट बोगद्याच्या तोंडाशी पलटी झाला. अपघातानंतर काही वेळातच टँकरमधून प्रोपलीन गॅसची गळती सुरू झाली. हा गॅस अत्यंत ज्वलनशील असल्याने अपघाताचा धोका टाळण्यासाठी येथील वाहतूक तत्काळ थांबवण्यात आली. 

अपघातानंतर अनेक तास उलटूनही गॅस गळती रोखण्यात प्रशासनाला यश आले नाही. तज्ञ पथक गळती थांबविण्याचे प्रयत्न करत असून परिस्थिती पूर्णतः नियंत्रणात येईपर्यंत अपघातग्रस्त टँकर हटविणे धोकादायक मानले जात आहे. त्यामुळे आडोशी बोगदा परिसरातील मुंबई मार्गिका अद्याप बंद ठेवण्यात आली आहे. बोरघाट परिसरात वाहतूक अत्यंत संथगतीने सुरु असून दोन्ही बाजूंनी लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, द्रुतगती महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याने पुण्याकडून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांनी जुन्या महामार्गाचा वापर करावा, असे पोलिसांनी सांगितले आहे. 

पर्यायी मार्ग असे ....

१. ताम्हिणी घाट मार्ग : पुणे → पौड → ताम्हिणी घाट → माणगाव → मुंबई. (दक्षिण मुंबईसाठी उपयुक्त)

२. माळशेज घाट मार्ग : पुणे → चाकण → नारायणगाव → माळशेज घाट → कल्याण/ठाणे. (उपनगरांसाठी उपयुक्त)

३. भीमाशंकर/मंचर मार्ग : उत्तर मुंबई किंवा पालघरकडे जाणाऱ्या प्रवाशांनी या मार्गाचा विचार करावा.

सूचना 

पर्यायी मार्गांवर प्रवासाचा वेळ साधारणपणे ३ ते ५ तासांनी वाढू शकतो. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या वाहनात पुरेसे इंधन, पिण्याचे पाणी आणि खाद्यपदार्थ सोबत ठेवावेत. जड वाहनांच्या चालकांना जवळच्या फूड मॉल्स किंवा सुरक्षित ठिकाणी वाहने उभी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खाजगी वाहनांऐवजी रेल्वे प्रवासाला (डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस किंवा इंटरसिटी) प्राधान्य दिल्यास प्रवास अधिक सुखकर होईल, असे प्रशासनाने सांगितले आहे.

- Emergency Helpline Numbers:

 * Expressway Control Room : 9822498224

 * Highway Police : 9833498334 / 100

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories

Please Accept Cookies for Better Performance