सांगवीमध्ये पीडब्ल्यूडी मैदानावर उद्यापासून पवनाथडी जत्रेची सुरवात
पिंपरी, ता. २४ - पिंपरी-चिंचवड महापालिका समाजविकास विभागाच्या वतीने बचत गटांतील महिलांना रोजगारासाठी व्यासपीठ देणारी पवनाथडी जत्रा बुधवारपासून (ता. २५) सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर सुरु होत आहे. जत्रेसाठी प्रशासनाकडून मैदानावर तयारी पूर्ण झाली आहे.
पवनाथडी जत्रेत सहभागासाठी अर्ज वाटप व स्वीकृती दिनांक १० फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आली. महिला बचत गटांकडून सामान्य प्रवर्गासाठी – ५११, शाकाहारी प्रवर्गासाठी – ३७३, मांसाहारी प्रवर्गासाठी – २१० अर्ज प्राप्त झाले आहेत. दिव्यांग राखीव प्रवर्गात ५ व तृतीयपंथी प्रवर्गासाठी – ३ अर्ज प्राप्त झाले. त्यांना लकी-ड्रॉ पद्धतीने गाळे वाटप २२ फेब्रुवारीला करण्यात आले. सोडती नुसार सामान्य प्रवर्गात बचत गटांना ४०५, शाकाहारी प्रवर्गात बचत गटांना १७२, मांसाहारी प्रवर्गात बचत गटांना १३५ गाळे देण्यात येणार आहेत.
सोडतीमध्ये गाळा (स्टॉल) मिळालेल्या बचत गटांना त्या स्टॉलसाठीचे अलोटमेंट लेटर वाटप मंगळवारी (ता. २४)पी.डब्लु. डी.ग्राउंड, जुनी सांगवी येथे सकाळी ११.३० पासून करण्यात येणार होते. सोडतीमध्ये स्टॉल मिळालेल्या बचत गटांची यादी समाज विकास विभाग माहिती केंद्र येथे लावण्यात आली असून ज्या बचत गटांना स्टॉल मिळालेले आहेत, त्या सर्वांना त्याबाबतचे एसएमएस देखील मोबाईलवर पाठवण्यात आलेले आहेत. स्टॉलवाटप पत्र घेण्यासाठी येताना आधार कार्डची झेरॉक्स, एक पासपोर्ट साईज फोटो आणि बँक पासबुक घेऊन यावे असे आवाहन करण्यात आले आहे.