'एक्सप्रेस-वे'वरील वाहतूक कोंडीमुळे एसटी पुणे विभागाचे ५० लाखांचे नुकसान
'एक्सप्रेस-वे'वरील वाहतूक कोंडीमुळे एसटी पुणे विभागाचे ५० लाखांचे नुकसान
पिंपरी, ता. ५ - गॅस टॅंकर पलटी झाल्यामुळे काल (ता. ४) पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील झालेल्या वाहतूक कोंडीमुळे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या १७२ शिवनेरी गाड्या व ९ लालपरी गाड्या रद्द झाल्या. मुंबईहून पुण्याला येणाऱ्या गाड्याही खोळंबल्या. त्यामुळे, राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाचे एक दिवसाचे सुमारे ५० लाखांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती एसटीच्या पुणे विभागाने दिली आहे.
याबाबत, राज्य परिवहन महामंडळाचे पुणे विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले की, ''पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाल्याने खासगी वाहनांसह एसटी बस वाहतूक कोंडीत अडकून पडल्या. स्वारगेट, वल्लभनगर व वाकडेवाडी आगाराच्या एसटी बस अडकून पडल्याने चालक-वाहकांनी संबंधित आगारांना माहिती दिली. सोशल मीडियावरही माहिती उपलब्ध झाल्याने मंगळवारी रात्रीपासूनच एसटी प्रशासनाने गाड्या न सोडण्याचा निर्णय घेतला.''