पिंपरी | २६ नोव्हेंबर २०२६ : चिखलीतील घरकुल परिसरात पावसाळ्यात पाणी साचून रहिवाशांची गैरसोय आणि मालमत्तेचे नुकसान होऊ नये, यासाठी महापालिकेने नाला बांधण्याचे आणि पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पर्यायी मार्गाचे नियोजन केले आहे. नाला बांधणीला गती द्या आणि पर्यायी निचऱ्याचे नियोजन तातडीने पूर्ण करा, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. शहरातील इतर इतर भागांमध्येही पावसामुळे पाणी साचण्याची समस्या असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीतील दिवंगत महापौर मधुकर पवळे सभागृहात शहरातील नागरी समस्या, पायाभूत सुविधा आणि सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीत चिखली घरकुल परिसरातील पावसाळी पाण्याचा मुद्दा चर्चेला आला. नाला बांधणी आणि पर्यायी निचऱ्याच्या नियोजनात विलंब होऊ नये, यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आयुक्तांनी सांगितले.
शहराच्या इतर भागांतही पावसाचे पाणी साचण्याची समस्या ज्या ठिकाणी उद्भवली होती, त्या ठिकाणांची पाहणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. पुढील पावसाळ्यात ही समस्या पुन्हा उद्भवू नये, यासाठी नियोजित कामे प्राधान्याने पूर्ण करण्यास त्यांनी सांगितले.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, तृप्ती सांडभोर आणि विक्रांत बगाडे, सहआयुक्त मनोज लोणकर, शहर अभियंता मनोज सेठिया, सहशहर अभियंता प्रेरणा सिनकर, उपआयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, सिताराम बहुरे, राजेश आगळे, सहाय्यक आयुक्त मुकेश कोळप, क्षेत्रीय अधिकारी अतुल पाटील, अजिंक्य येळे, अश्विनी गायकवाड, निवेदिता घार्गे, परशुराम वाघमोडे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.