अजित पवार यांच्या विमान अपघाताचा तपास 'सीआयडी'कडून योग्य दिशेने सुरु - सुनील रामानंद
सीआयडीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील रामानंद यांची माहिती
पुणे, ता. २६ - ''उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या तपासात काही पुरावे गोळा करण्यात आले आहेत. अपघातामध्ये कोणता घातपात आहे का, गुन्हेगारी कृत्य घडले आहे का? या दृष्टीने तपास केला जात आहे. एएआयबी (Aircraft Accident Investigation Bureau) एएआयबी यंत्रणेकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यातील निष्कर्ष हा तपासात महत्त्वाचा घटक राहणार आहे. त्याआधारे पुढील तपास करण्यात येईल, अपघाताचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण (सीआयडी) विभागाकडून योग्य दिशेने सुरु आहे.'' , अशी माहिती सीआयडीचे अतिरिक्त पोलिस आयुक्त सुनील रामानंद यांनी गुरुवारी (ता. २६) पत्रकार परिषदेत दिली.
रामानंद यांनी सांगितले की, बारामती वैद्यकीय शासकीय महाविद्यालयाच्या फॉरेन्सिक सायन्स लॅब, एविएशन ऑथॉरिटी आणि केंद्रातील तपास यंत्रणा या प्रकरणाच्या तपासात सहकार्य करीत आहेत. एएआयबी आणि सीआयडी यांच्यामध्ये समन्वय ठेवून तपास करण्यात आहे. एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन ब्युरोचा निष्कर्ष प्राप्त झाल्यानंतर त्याआधारे सीआयडीकडून पुढील तपास केला जाईल.
राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) सोपविण्यासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. सीआयडीने या प्रकरणात बरेच पुरावे एकत्रित केले आहेत. आणखी काही पुरावे गोळा करण्याचे काम सुरु आहे.
या पत्रकार परिषदेस सीआयडीचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुधीर हिरेमठ, सीआयडी पुणे पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील, सीआयडी मुंबई कोकण विभागाचे पोलिस अधीक्षक प्रशांत वागुंडे उपस्थित होते.