क्रिडासंस्कृती जोपासणारी तरुण पिढी भविष्यात सक्षम भारत घडवेल - अभिषेक बारणे आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धेचा काळेवाडीत प्रारंभ..........
Apr 07 2026
49
क्रिडासंस्कृती जोपासणारी तरुण पिढी भविष्यात सक्षम भारत घडवेल - अभिषेक बारणे
आमदार चषक बॅडमिंटन स्पर्धेचा काळेवाडीत प्रारंभ
पिंपरी, ता. ७ - '' ‘आमदार चषक’ सारख्या व्यासपीठामुळे स्थानिक स्तरावरील गुणवान खेळाडूंना आपली प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळत आहे. खेळ केवळ हार-जीत यासाठी नसून तो आयुष्यात शिस्त आणि जिद्द निर्माण करतो. क्रिडासंस्कृती जोपासणारी हीच तरुण पिढी भविष्यात सक्षम भारत घडवेल.'', असा विश्वास महापालिकेच्या स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी व्यक्त केला.
चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून काळेवाडी येथे भव्य ‘आमदार चषक’ बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (ता. ६) सकाळी काळेवाडीतील ज्योतिबा उद्यान येथील छत्रपती शिवाजी महाराज बॅडमिंटन कोर्टवर या स्पर्धेचे उद्घाटन अभिषेक बारणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
''आमदार शंकर जगताप यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासोबतच क्रीडा क्षेत्रालाही नेहमीच प्राधान्य दिले आहे. त्यांच्या नेतृत्वात खेळाडूंसाठी उत्कृष्ट सोयी-सुविधा उपलब्ध होत आहेत.'' अशा शब्दात अभिषेक बारणे यांनी आमदार शंकर जगताप यांचे कौतुक केले.
या सोहळ्याला राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती. यावेळी, नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, सविता खुळे, सामाजिक कार्यकर्ते विनोद तापकीर, नरेश खुळे, विलास पाडाळे, सचिन काळे, सागर तापकीर यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. गोपाळ माळेकर आणि पवना हेल्थ क्लबने स्पर्धेचे संयोजन केले.
प्रतिभेला हक्काचे मैदान मिळाले...
आमदार शंकर जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या स्पर्धेने परिसरातील क्रीडाप्रेमींचे लक्ष वेधून घेतले असून, स्थानिक खेळाडूंमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या प्रेरणादायी उपक्रमाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे विशेष अभिनंदन केले. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित “आमदार चषक” स्पर्धेमुळे काळेवाडी परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवी चालना मिळाली असून, आगामी काळात अशा स्पर्धांमधून नव्या प्रतिभेला हक्काचे मैदान मिळाले आहे.
- अभिषेक बारणे, सभापती स्थायी समिती, महापालिका