शहराची सांस्कृतिक ओळख भक्कम करणाऱ्या शहरातील कलाकारांचा होणार सन्मान
महापौर रवी लांडगे यांची पत्रकार परिषदेत माहिती
पिंपरी, ता. ३ - पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक विकासाबरोबरच कला, साहित्य, नाट्य आणि नृत्य क्षेत्रातही समृद्ध परंपरा जपणारे शहर आहे. या क्षेत्रात अनेक ज्येष्ठ कलाकारांनी दीर्घकाळ योगदान देऊन शहराची सांस्कृतिक ओळख अधिक भक्कम केली आहे. अशा कलाकारांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी गुरुवारी (ता. २) पत्रकार परिषदेत दिली.
महापौर लांडगे म्हणाले, ''शहरातील कला, साहित्य, नाट्य आणि नृत्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान करून त्यांच्या योगदानाची दखल घेणे ही महापालिकेची सामाजिक व सांस्कृतिक जबाबदारी आहे. या माध्यमातून नव्या पिढीला प्रेरणा मिळेल आणि शहरातील सांस्कृतिक चळवळीला अधिक बळ मिळेल. तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी महानगरपालिका विविध उपक्रम राबवत असून, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रालाही तितकेच प्रोत्साहन दिले जात आहे.''
सन्मान केल्या जाणाऱ्या कलाकारांची प्राथमिक यादी -
कला-क्रिडा-साहित्य-सांस्कृतिक समितीच्या वतीने शहरातील कला, साहित्य, नाट्य आणि नृत्य क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांची यादी निश्चित करण्यात आली आहे. त्यामध्ये अभिनेते, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघ चिटणीस मधुकर जोशी, तबलावादक धोंडीराम सायकर, आंतरराष्ट्रीय किर्तीचे नर्तक पद्मश्री नंदकिशोर कपोते, लेखक रमेश वाकनीस, अभिनेते, दिग्दर्शक सुहास जोशी, साहित्यिक, व्याख्याते, कामगार नेते अरूण बोऱ्हाडे, लेखिका कल्पना क्षीरसागर, लेखिका वंदना घांगुर्डे, शास्त्रीय संगीत गायक पंडित चव्हाण, समाज प्रबोधनकार शारदा मुंढे, भरतनाट्यम नृत्यांगना गीता शर्मा, अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, निर्माते डॉ. संजीवकुमार पाटील, चित्रकार प्रफुल्ल भिष्णूकर, क्रीडा शिक्षक आणि लेखक डॉ. मनोज देवळेकर, कथ्थक नर्तिका वैशाली धोंगडे, अभिनेते, दिग्दर्शक, संगीतकार श्रीकृष्ण (समीर) कालमित्रा, कवियित्री सीमा गांधी, आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रकार संजय काळभोर या कलाकारांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती कैलास कुटे यांनी यावेळी दिली.