ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे निधन, सोबमवारी होणार अंत्यसंस्कार
पुणे, ता. 12 - रसिकमनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी वयाच्या ९२ वर्षी निधन झाले. हिंदी चित्रपटसृष्टीतील चिरतरुण आवाज शांत झाला आहे.
आशाताईंचे पुत्र आनंद भोसले यांनी आशताईंच्या निधनाची बातमी दिली. आशाताईंच्या पार्थिवावर सोमवारी सायंकाळी शिवाजी पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. सोमवारी सकाळी त्यांचे पार्थिव सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत त्यांच्या लोअर परेल इथल्या 'कासा ग्रांडे' निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
प्रकृती अस्वास्थामुळे आशा भोसले यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं. तिथेच उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशाताईंच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली आहे.
आशाताईंचा आवाज गेली आठ दशके मनामनात रूंजी घालतोय. त्यांचा जन्म ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीमध्ये झाला. आशाताईंच्या गायनाची सुरुवात वयाच्या ९ व्या वर्षापासून झाली.
केवळ हिंदीतच नाहीतर, मराठी, बंगाली, गुजराती, तमिल, तेलुगुसह अनेक भाषांमध्ये गाणी गायली आहेत. हिंदी सिनेसृष्टीतील दिग्गज संगीतकार आरडी बर्मन, ओपी नैय्यर, सचिन देव बर्मन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्यासोबत आशाताईंनी गायलेली असंख्य गाणी अजरामर आहेत.
आशाताईंना पद्मविभूषण आणि दादासाहेब फाळके, महाराष्ट्र भूषण यांसह अनेक मानाच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. आवाजाच्या रुपात आशाताई नेहमी रसिकांसोबत असतील.